सलग ३६ तास कल्याणमध्ये रंगणार अखंड वाचनयज्ञ
सलग ३६ तास रंगणार अखंड वाचनयज्ञ
कल्याणमध्ये अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचा उपक्रम
कल्याण, ता. ४ : विद्यार्थी व युवकांमध्ये वाचनाची गोडी वाढावी आणि त्यांना मराठीतील साहित्य व लेखकांची माहिती व्हावी या हेतूने अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी (ता. ५) सकाळी ते शनिवारी (ता. ६) सायंकाळी ८ वाजेपर्यंत सलग ३६ तास आणि एकत्रित ३०० तास अखंड वाचन यज्ञाचे बालक मंदिर संस्था सभागृह येथे आयोजन करण्यात आले आहे. योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून गेल्या तीन वर्षांपासून अखंड वाचनयज्ञ उपक्रम राबवला जात आहे. पहिल्या वर्षी या उपक्रमात १,१०० वाचक सहभागी झाले होते, तर दुसऱ्या वर्षी एक हजार ६७८ वाचकांनी सहभाग नोंदवला होता. यंदाच्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये २,५०० हून अधिक वाचक सहभागी होणार असल्याचे संस्था सचिव हेमंत नेहते यांनी सांगितले.
दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमांतर्गत नाना पालकर वाचनसत्र, स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनसत्र, नारायण धारप वाचनसत्र, मंगेश पाडगावकर वाचनसत्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनसत्र, डॉ. एपीजे अब्दुल कलाम वाचनसत्र, कुसुमाग्रज वाचनसत्र, ना. धो. महानोर वाचनसत्र अशा विविध सत्रांमध्ये विद्यार्थी, युवक आणि विविध रसिक वाचक कथा, कविता, कादंबरी, लेख यांचे वाचन करणार आहेत. विविध सत्रांमध्ये प्रशांत वैद्य, दत्तप्रसाद जोग, डॉ. दिनेश प्रताप सिंग, माधव डोळे, नागेश हुलवळे, वैभव धनवडे, विजयकुमार देसले, मच्छिंद्र कांबळे, प्रवीण देशमुख, श्यामसुंदर पांडे, नंदा कोकाटे, सुकन्या जोशी आदी मान्यवर साहित्यिक आपल्या साहित्याचे अभिवाचन करणार आहेत.
समारोप सत्रामध्ये प्रसिद्ध लेखिका सारिका कुलकर्णी, शिक्षण सेवाव्रती डॉ. सुनील खर्डीकर, जागतिक कीर्तीचे विक्रमवीर डॉ. दिनेश गुप्ता उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमासाठी बालक मंदिर संस्था, कोकणमेवा योजक, रेगे दीक्षित क्लासेस, जोशी फायनान्शिअल सर्व्हिसेस, पै फ्रेंड्स लायब्ररी, कल्याण नागरिक, ठाणे वैभव, सुस्वर क्रिएशन्स, माउली एक शैक्षणिक ध्यास, साहित्यसंपदा, आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था यांचे सहकार्य लाभणार आहे. या उपक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून पूर्व नोंदणी आवश्यक आहे, असे प्रकल्प प्रमुख डॉ. सुश्रुत वैद्य यांनी सांगितले.
रेखाचित्रांचे प्रदर्शन
पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक पुंडलिक पै, लेखक मंदार धर्माधिकारी, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. विवेक बिवलकर, माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांच्या हस्ते बालक मंदिर संस्था येथील वि. आ. बुवा वाचन नगरी, भारताचार्य चिंतामणराव वैद्य सभागृह, डॉ. जयंत नारळीकर वाचन कट्टा, योगानंद क्लासेस येथील बाळ कोल्हटकर वाचन कट्टा आणि चित्रकार प्रदीप जोशी यांनी रेखाटलेल्या साहित्यिकांच्या रेखाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
२५ हून अधिक शाळांचा सहभाग
यानंतर बालक मंदिर संस्था प्राथमिक, माध्यमिक विभाग मराठी व इंग्रजी माध्यम, मुंब्रा येथील ज्ञानदीप विद्यामंदिर व ज्ञानदीप कॉन्व्हेंट स्कूल, अंबरनाथमधील रोटरी स्कूल, हाशिवरेतील महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथमधील ज्ञानामृत माध्यमिक विद्यालय, दिवा येथील न्यू होली स्पिरिट स्कूल, मनमाड मालेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळा अशा एकूण २५ हून अधिक शाळांमधील विद्यार्थी सकाळ आणि दुपारच्या सत्रात व्यासपीठावर येऊन वाचन करणार आहेत.
विविध उपक्रमांचे आयोजन
विविध विषयांवर कविसंमेलन, गझल मुशायरा, काव्यवाचन स्पर्धा, वाचू आनंदे उपक्रम, माझे आयडॉल उपक्रम, जयंत भावे यांच्या ‘प्रतिबिंब’ व योगेश जोशी यांच्या ‘वंद्य वंदे मातरम्’ या पुस्तकांचे प्रकाशन असे विविध उपक्रम अखंड वाचनयज्ञाअंतर्गत येथे सादर होणार आहेत, अशी माहिती या संपूर्ण उपक्रमाचे संकल्पनाकार योगेश जोशी यांनी दिली.

