डाॅ. बाबासाहेबांच्या ग्रंथप्रेमाचा साक्षीदार ‘राजगृह’

डाॅ. बाबासाहेबांच्या ग्रंथप्रेमाचा साक्षीदार ‘राजगृह’

Published on

डाॅ. बाबासाहेबांच्या ग्रंथप्रेमाचा साक्षीदार ‘राजगृह’

दरराेज देशभरातून वास्तूला भेट; अनेक आठवणींचे जतन

मयूर फडके : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : राजगृह ही वास्तू नसून संपूर्ण आंबेडकरी अनुयायांचे श्रद्धास्थान आहे. ही वास्तू डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची ज्ञानार्जनाची भूक आणि त्यांच्या ग्रंथप्रेमाची जिवंत साक्षीदार आहे. बाबासाहेबांनी राजगृह केवळ ग्रंथासाठी बांधले होते. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूत त्यांचा अमूल्य ग्रंथखजिना, त्यांनी वापरलेल्या वस्तू संग्रहित करण्यात आल्या असून येथे देशभरातून दरराेज लोकांचा राबता असताे.

१९३०नंतर बाबासाहेबांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत गेली. तेव्हा बाबासाहेबांचे कार्यालय परळच्या दामोदर हाॅलजवळ होते. घरी वाढता राबता पाहता पोयबावाडीतील घर अपुरे पडू लागल्यामुळे पुस्तके ठेवण्याची अडचण झाली होती. त्यामुळे त्यांनी स्वतःसाठी दोन भूखंड खरेदी करून त्यावर राजगृह हा बंगला ग्रंथांसाठी तर कुटुंबीयांना राहण्यासाठी चारमिनार ही वास्तू बांधली. या दोन्ही वास्तू तीन माळ्यांच्या होत्या. १९४२मध्ये मजूर मंत्री म्हणून बाबासाहेब दिल्लीला शिफ्ट झाले. त्यामुळे त्यांनी राजगृह हे विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल म्हणून वापरायला दिले. त्यांचे कुटुंबीय खारला राहत होते.

राजगृहाच्या बांधकामाची सुरुवात १९३१मध्ये झाली. हे काम जवळपास दोन वर्षांनी पूर्ण झाले. राजगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जवळजवळ ५० हजार दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह होता. त्या वेळी ते सर्वात मोठे ग्रंथालय होते. यात मराठी, इंग्रजीसह गुजराती, उर्दू, फ्रेंच, जर्मन आणि पारशी भाषेतील ग्रंथांचाही समावेश होता.

ग्रंथप्रेमासाठी कर्ज
बाबासाहेबांनी जगभरातून असंख्य ग्रंथ विकत घेतले होते. त्यातून त्यांच्यावर कर्ज झाले. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांना १९४१ मध्ये चारमिनार बंगला त्यांना विकावा लागला. दुसरीकडे सिद्धार्थ विहार हॉस्टेल आकाराला आल्यानंतर राजगृहात राहणारे विद्यार्थी तिकडे स्थलांतरित झाले आणि राजगृहात आंबेडकरी कुटुंबीय राहायला आले.

बाबासाहेबांनी वापरलेल्या दुर्मिळ वस्तू
राजगृहाच्या तळमजल्यावरील खोल्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई यांनी वापरलेल्या अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यात भांडी, बाथ टब, अनेक जुने दुर्मिळ फोटो, अभ्यासाचा टेबल, छड्या, दोन पातींचा पंखा, गरम पाण्याचे यंत्र, पलंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, गौतम बुद्ध यांची प्रतिमा याचा समावेश आहे. त्या वेळी लंडनमधून दोन बाथटब आले होते. त्यातील एक टाटांचा तर दुसरा बाबासाहेबांचा होता. या खोलीत डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची प्रत तसेच त्यावर चष्मा ठेवण्यात आलेला आहे.

अस्थिकलश आणि बेड
राजगृहावरच बाबासाहेबांचं पार्थिव आणण्यात आले होते. ७ डिसेंबरच्या दुपारी इथूनच बाबासाहेबांचा अखेरचा प्रवास सुरू झाला. दादर चौपाटीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर तेथे एक स्तुप उभारण्यात आला. त्याला चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते. बाबासाहेबांच्या अस्थी राजगृहात जपून ठेवण्यात आल्या आहेत.
----
ग्रंथावर पुत्रवत प्रेम
बाबासाहेबांचे ग्रंथांवर पुत्रवत प्रेम होते. एकदा त्यांची ग्रंथपेटी समुद्रात बुडाली, तेव्‍हा त्यांना खूप दुःख झाले होते. त्यांनी चारमिनार ही वास्तू विकून ग्रंथालयाच्या इमारतीची देखभाल केली. येथे माता रमाई यांचा मृत्यू झाला होता. या वास्तूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे काही काम केले होते, असे साहित्यिक ज. वि. पवार यांनी सांगितले.
.........
राजगृहाला दररोज देशभरातून आलेले सरासरी दीडशे ते दोनशे लोक भेट देतात. महापरिनिर्वाण दिवस तसेच आंबेडकर जयंतीला भेट देणाऱ्यांची माेठी गर्दी असते.
- उमेश कसबे, राजगृह व्यवस्थापक
----
लोक स्वत:ला राहण्यासाठी बंगला बांधतात. बाबासाहेबांनी ग्रंथांसाठी हा बंगला बांधला. हे जगातील एकमेव उदाहरण आहे. यातून बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम आणि ज्ञानार्जनाची भूक दिसून येते. हेच राजगृहाचे वेगळेपण आहे.
- प्रा. विजय मोहिते, सिद्धार्थ कॉलेज, पाली विभाग
.......
आज पहिल्यांदा राजगृहाला भेट दिली. सामाजिक कार्यात स्वतःला नव्याने वाहून देण्याची प्रेरणा बाबासाहेबांच्या या वास्तूमुळे मला मिळाली.
- विजय कांबळे, मोनिका कांबळे, इंदापूर
..........................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com