अभिवादनासाठी चैत्यभूमी सज्ज
अभिवादनासाठी चैत्यभूमी सज्ज
‘दीपस्तंभ’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांना नागरी सेवासुविधा मुंबई महापालिकेने पुरविल्या आहेत. चैत्यभूमीपुढे नतमस्तक होण्यासाठी आंबेडकरी अनुयायांच्या गर्दीच्या लाटा आजपासूनच धडकत आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी पार्क येथे ‘दीपस्तंभ’ या माहिती पुस्तिकेचे आज प्रकाशन झाले.
मुंबई महापालिकेने चैत्यभूमी आणि परिसरात सेवासुविधा पुरविल्या आहेत. शिवाजी पार्क येथे निवासी मंडपाची सोय करण्यात आली आहे. ज्यात अनुयायांना तात्पुरता निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. निवासी मंडपात एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. त्यात अभिवादनाचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. अभिवादनासाठीच्या रांगेत तसेच मुख्य मार्गांवर एकूण १५० फिरती शौचालये उपलब्ध आहेत. मैदान परिसरात २५४ शौचालयांची व्यवस्था केली आहे. महिलांसाठी विशेष पिंक टॉयलेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त नळ व शॉवर सुविधेसह २८४ तात्पुरती स्नानगृहे तयार करण्यात आली आहेत. पायवाटांवर धूळप्रतिबंधक आच्छादन केले आहे. स्वच्छतेसाठी ५२७ कामगारांसह विविध संयंत्रे सज्ज आहेत. आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा, २० रुग्णवाहिका, राजगृह येथेही नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
...
सुरक्षेसाठी व्यवस्था
सुरक्षेच्या दृष्टीने सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे, फिरते कॅमेरे, मेटल डिटेक्टर्स, बॅग स्कॅनर्स आदी व्यवस्था करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष, माहिती कक्ष व निरीक्षण मनोऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. या वेळी अग्निशमन वाहने, अतिदक्षता रुग्णवाहिका आणि दादर चौपाटी येथे बोट इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी २५४ नळांसह १६ टँकरची व्यवस्था असून, अनुयायांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी महत्त्वाचा असलेला हिरकणी कक्षदेखील उभारण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमाच्या वतीने संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई आणि मोबाईल चार्जिंगसाठी शिवाजी पार्क येथे विशेष सुविधा पॉइंट उपलब्ध केले आहेत. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर ५००हून अधिक पुस्तकांचे स्टॉल्स लागले आहेत.
...
मान्यवरांची उपस्थिती
‘दीपस्तंभ’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते शिवाजी पार्कवर झाले. या वेळी उप आयुक्त प्रशांत सपकाळे, सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते, नागसेन कांबळे, रमेश जाधव, रवी गरूड, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. माहिती पुस्तिका अनुयायांना विनामूल्य वितरित केली जाणार आहे, तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर https://www.mcgm.gov.in पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठीदेखील उपलब्ध आहे.

