महायुतीचे घोडे अजून अडलेलेच

महायुतीचे घोडे अजून अडलेलेच

Published on

भाईंदर, ता. ६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे. महायुतीचे घोडे मात्र युती करायची की नाही, करायची झाली तर त्याची बोलणी कोणासोबत करायची यावरच अडले आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आता मनसेही सहभागी झाली आहे; मात्र भाजप-शिवसेनेत युती होण्याच्या दृष्टीने अजूनही ठोस हालचाली झालेल्या नाहीत. भाजपने युतीसाठी ६५-१७ चा फॉर्म्युला शिवसेनेला दिला आहे. त्यावर स्थानिक पातळीवर अजून तरी कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. सुमारे ९५ जागांपैकी भाजप ६५ जागा लढवण्यावर ठाम आहे व शिवसेनेला १७ जागा देऊ केल्या आहेत. उर्वरित १३ जागांचे वाटप करण्यावर चर्चा व्हावी, असा भाजपचा प्रस्ताव आहे.

२०१७ च्या पालिका निवडणुकीत भाजपने ६१ जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेने २२ जागांवर विजय मिळवला होता. महापालिकेची मुदत संपेपर्यंत शिवसेना व अन्य पक्षातील नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला तर भाजपच्या एका नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे भाजपची ताकद ६५ पर्यंत वाढल्याचा दावा भाजपचा आहे. या ६५ जागा सोडून उर्वरित जागांवरच युतीची बोलणी व्हावीत, असे भाजपचे म्हणणे आहे.

भाजपने महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी स्थानिक पातळीवर आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर दिली आहे, तर शिवसेनेचे स्थानिक पातळीवर सर्वेसर्वा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आहेत. त्यामुळे युतीची प्राथमिक बोलणी या दोघांमध्येच होतील, अशी अपेक्षा होती; मात्र मध्यंतरी सरनाईक यांनी युतीसंदर्भातील सर्व बोलणी आपण प्रदेश पातळीवरच करू, अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे सरनाईक युतीसंदर्भात मेहता यांच्याशी चर्चा करू इच्छित नाहीत, हे उघड झाले आहे; त्यामुळे चर्चेचे गाडे पुढे सरकलेले नाही.

सहकारी पक्षांना स्थान?
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भारतीय रिपब्लिक पक्ष (आठवले गट) या घटक पक्षांचा समावेश आहे. भाजप-शिवसेनेतील जागावाटपाच्या रस्सीखेचात उर्वरित दोन पक्षांना स्थान मिळणार की नाही, हेदेखील स्पष्ट नाही.

चर्चांना वेग
विधिमंडळाचे सोमवारपासून (ता. १४) सुरू होत असलेले अधिवेशन १८ डिसेंबरला संपणार आहे. त्यानंतर कधीही महापालिका निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदरमध्ये महायुती होणार की नाही, यावर उलटसुलट चर्चा रंगली आहे.

मिरा-भाईंदरमध्ये युती करण्याची भाजपची तयारी आहे. महायुतीच्या जागावाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी नुकतीच चर्चा केली. त्यांच्यासमोर ६५-१७ चा फॉर्म्युला ठेवला. त्यावर शिंदे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे; मात्र त्यानंतर पुढे चर्चा झालेली नाही.
- नरेंद्र मेहता, आमदार

युती करण्यासाठी शिवसेनेचीही तयारी आहे; मात्र अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्या जाहीर झाल्यानंतर भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com