ठाणे जिल्ह्यात २२३ नवे कुष्ठरोगाचे रुग्ण
ठाणे जिल्ह्यात २२३ नवे कुष्ठरोगाचे रुग्ण
१७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर सर्वेक्षणात आढळले रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : गैरसमजुती, रोगाबाबतची अंधश्रद्धा आणि भीतीच्या विळख्यात आजही ठाणे जिल्ह्यातील विविध भागातील कुष्ठरोग रुग्ण उपचार घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी कुष्ठरोग निर्मुलन विभागाच्या माध्यामतून १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत करण्यात आलेल्या सर्वेक्षण मोहिमेत २४ हजार १२१ संशयित रुग्णांची तपासणी केली असता त्यामध्ये २२३ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत असली तरी काही आजारांची नावे निघताच आजही भुवया उंचावल्या जात आहेत. या यादीत लैंगिक आजारांसह कुष्ठरोगाचाही समावेश आहे. याबाबत जनप्रबोधनाचे कार्य सातत्याने होत असले तरी नव्या रुग्णांची होणारी नोंद चिंताजनक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाकडून नियमित कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत असते. यातंर्गत जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात नवीन रुग्णांची नोंद करण्यात येत असते. कुष्ठरोग या आजारावर वेळीच उपचार केल्यास त्यास अटकाव करण्यास मदत होते. यासाठी कुष्ठरोग निर्मुलन विभागाकडून अजूनही या आजाराबाबत गैरसमज असलेल्या व आजार लपविणाऱ्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी मोहिम राबविण्यात येत असते. त्यानुसार यंदा ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगर परिषद आणि पाच तालुके (ग्रामीण) भागात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्यकार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत सर्वेक्षण मोहिम हाती घेण्यात आली. यावेळी ४० लाख ३९ हजार ९९४ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये २४ हजार ५५८ कुष्ठरोग संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी २४ हजार १२१ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये २२३ नवे कुष्ठरोग असलेले रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
कुष्ठरोग याबाबत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा समन्वय समितीच्या वतीने सर्व अतिजोखमीच्या भागात राहणाऱ्या समाज घटकातील कुष्ठरोगाची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन ठाणे जिल्हा सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. मनीष रेंघे यांनी केले.
कुष्ठरोगाची लक्षणे :
- कुष्ठरोग जीवाणूमुळे होणारा सांसर्गिक आजार आहे.
- अंगावर असणारा फिक्कट, लालसर रंगाचा बधिर चट्टा व हाता-पायामध्ये अशक्तपणा येणे ही कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे आहेत.
- कानाच्या पळया जाड होणे व चेहरा लालसर, तेलकट व जाड होणे.
- त्वचेशी संलग्न मज्जा जाड व दुखऱ्या होणे.
- कुष्ठरोग सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो.
कुष्ठरोग शोध मोहिम सर्वेक्षण पथके
सर्वेक्षण पथके - दोन हजार ४३२
पर्यवेक्षक - ५३३
सर्वेक्षण करिता घेण्यात आलेली लोकसंख्या - ४१ लाख ४८ हजार ९३५
आतापर्यंत तपासलेली लोकसंख्या - ४० लाख ३९ हजार ९९४
आढळलेले कुष्ठरोग संशयित रुग्ण- २४ हजार ५५८
तपासले संशयित रुग्ण - २४ हजार १२१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

