-जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, - समिती करणार चौकशी
‘ट्राॅमा केअर’मध्ये हजेरी नाेंदीत गैरप्रकार
जाेगेश्वरीतील रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्न; प्रक्रियेशिवाय नियुक्त्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : जोगेश्वरी पूर्वेतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि वेतनप्रक्रियेबाबत गंभीर मुद्दे उघडकीस आले आहेत. कागदपत्रांतून सुमारे ६० ते ७० कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही औपचारिक निवड प्रक्रिया न राबवता झाल्याचे दिसून आहे. हा प्रकार मार्च २०२५पर्यंत सुरू असल्याची नोंद असून काही कर्मचाऱ्यांच्या हजेरी नोंदी अपूर्ण असून त्यांना वेतन मिळत असल्याचे तपासणीत उघड झाल्याने या रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रुग्णालयात बाह्य स्राेताद्वारे करण्यात आलेल्या १०५ नियुक्त्यांपैकी अनेक नोंदी संशयास्पद आढळल्या आहेत. प्रत्यक्ष कामावर हजर न राहता काही कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतन काढल्याचे दस्तऐवजांतून स्पष्ट झाले आहे. या नियुक्त्या आणि वेतन व्यवहार तत्कालीक ठेका लिपिक आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्या अखत्यारीत झाल्याचे दिसून आले आहे.
रुग्णालयातील अत्याधुनिक उपकरणांच्या वापराबाबतचा गंभीर तपशील समोर आला आहे. सुमारे १२ कोटी रुपये खर्चून बसवलेल्या डीएसए यंत्राचा अडीच वर्षांत केवळ २११ रुग्णांवर वापर झाल्याची माहिती विधान परिषदेत देण्यात आली. हृदयरोगतज्ज्ञ नसल्याने गंभीर रुग्णांना केईएम, कूपर किंवा नायर रुग्णालयांत हलवण्याची वेळ येते. २०२२मध्ये मंजूर झालेल्या व्हेंटिलेटर खरेदीचा निधी उपकरण न मिळाल्याने परत पाठवावा लागला होता.
दरम्यान, उपअधीक्षक डॉ. स्नेहल जाधव यांच्या नोंदीत काही कर्मचाऱ्यांना अधिक वेतनावर नियुक्त करून नंतर त्यांना प्रत्यक्ष हजर राहू न देण्याची आणि त्यांचे वेतनकपात करण्याची पद्धत राबवल्याचा उल्लेख आहे. या नोंदीनंतर रुग्णालयातील व्यवस्थापन पद्धतीबाबत अधिक स्पष्टता मिळवण्यासाठी चौकशी समिती नेण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले.
----
चाैकशीसाठी समिती स्थापन
महापालिकेने १९ नोव्हेंबर २०२५ रोजी तातडीने चौकशी समिती स्थापन केली असून हा संपूर्ण प्रकार लक्षात घेता कोणताही गैरव्यवहार झाला आहे का, हे तपासण्यासाठी समितीला सविस्तर परीक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही समिती महापालिका मुख्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय संचालिका डॉ. नीलम आंद्राडे यांनी स्थापन केली आहे. समितीत सहप्रमुख कर्मचारी अधिकारी मृणालिनी सुर्वे, औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ. नीलम रेडकर व उपअधीक्षक (प्रशासन) डॉ. घनश्याम अहुजा यांचा समावेश असून नियुक्त्या, वेतन प्रक्रिया, उपस्थिती नोंदी आणि उपकरणांचा वापर यांची सखोल तपासणी समिती करणार आहे.
------
रुग्णालयातील गैरप्रकाराच्या चाैकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. चाैकशीनंतर ही समिती अहवाल देणार आहे. त्यानुसार पुढची कार्यवाही करण्यात येणार आहे.
- डॉ. नीलम आंद्राडे, वैद्यकीय संचालिका, प्रमुख रुग्णालये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

