मुरबाडमध्ये लोककलांचा वारसा जपणारा वासुदेव
मुरबाडमध्ये लोककलांचा वारसा जपणारा वासुदेव
दुर्मिळ भेटीने जुन्या आठवणींना उजाळा
सुधाकर वाघ : सकाळ वृत्तसेवा
टोकावडे (ता. ७) : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या वासुदेवाचे दर्शन मुरबाड तालुक्यातील आंबेळे आणि सरळगाव परिसरात झाल्यानंतर ग्रामस्थांना त्यांच्या जुन्या आठवणींचा सुखद अनुभव मिळाला. आधुनिक जीवनशैलीमुळे दुर्मिळ झालेला हा लोककलावंत पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
पहाटेच्या सावळ्या प्रकाशात पारंपरिक वेषातील वासुदेव गावाच्या वेशीवर दिसला. घोट्यापर्यंतचा झगा, कमरेला शेला, गळ्यात कवड्यांच्या माळा, पायात नादमय घुंगरू आणि डोक्यावर मोरपिसांची उंच टोपी... अशा वेशभूषेत, हातात टाळ चिपळ्या घेऊन तो ‘सकाळच्या पारी हरिनाम बोला’ असे अभंग गात पुढे सरकत होता. त्याच्या घुंगरूंचा नाद संपूर्ण वातावरणात एक वेगळीच पवित्रता आणि आनंद निर्माण करत होता.
एकेकाळी सणासुदीला आणि हिवाळ्यात वासुदेवाच्या फेऱ्या हमखास चालायच्या. तो पांडुरंगावरील अभंग आणि गवळणी गात दारोदार फिरायचा, तर लोक त्याला दान देत असत. त्याच्या आगमनाने घरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण व्हायचे.
परंपरा जतन करण्याची गरज
सध्या मोबाईल, स्पीकर्स आणि आधुनिक मनोरंजनामुळे वासुदेवाचे दर्शन क्वचितच घडते. तरुण पिढीला तर या लोककलावंताचा इतिहासही अपरिचित आहे. वासुदेवाच्या दर्शनाने ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. ‘‘पूर्वी वासुदेव रोजच गावात फिरायचा, त्याच्या गाण्याने दिवसाची सुरुवात पवित्र वाटायची,’’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
तरुणांचा प्रतिसाद
तरुणांनीही या दुर्मिळ क्षणाचे व्हिडिओ मोबाईलवर टिपून समाजमाध्यमांवर शेअर केले. लोककलांच्या या जिवंत परंपरेला पुढे नेणारे हात कमी होत असल्याने ही परंपरा लयाला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामीण महाराष्ट्राच्या लोकपरंपरा टिकवण्यासाठी अशा कलावंतांचे जतन आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे. अशा परंपरा जपल्या नाहीत, तर पुढच्या पिढीला आपल्या लोककला केवळ पुस्तकांतच पाहायला मिळतील, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

