कल्याण डोंबिवलीकरांची पाण्याची तहान कायम स्वरुपी निकाली काढणार.....
कल्याण-डोंबिवलीकरांची तहान कायमस्वरूपी निकाली काढणार
काळू धरणाच्या निर्मितीच्या कामाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
कल्याण, ता. ७ (वार्ताहर) ः कल्याण-डोंबिवली पालिकेचे स्वतंत्र धरण असावे याकरिता काळू धरण उभारण्यासाठी मुख्यमंत्री असताना चालना दिली व त्यासाठी एमएमआरडीच्या माध्यमातून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तत्काळ पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. आता या धरणाच्या कामाला गती देण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. पालिका क्षेत्रातील नागरिकांची पाणीटंचाईची समस्या कायमची सुटण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. त्यामुळे येत्या काहीच वर्षांत स्वतंत्र धरणाचा प्रश्न निकाली निघणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
डाेंबिवलीतील संत सावळाराम क्रीडा संकुलात देशातील पहिले व्हर्टीकल स्पोर्ट संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या बहुमजली इनडोअर-आऊटडोअर इमारतीचे आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे कामाचे भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या वेळी प्रेरणा वॉर मेमोरियल स्मारकाचेही लोकार्पण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजेश माेरे, सुलभा गायकवाड, माजी महापौर विनीता राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख गाेपाळ लांडगे, पद्मश्री गजानन माने आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने विकास प्रकल्प आणि मेट्रोच्या कामांना स्थगिती देत अडथळे आणले होते, मात्र आमच्या महायुतीचे सरकार येताच हे सर्वच अडथळे दूर करीत विकासाला गती दिली. विकासकामांकरिता कधीही निधी कमी पडू दिला नाही. विकासकामांचा पाठपुरावा आणि त्यासाठी निधी मंजूर करण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे विकासाचे व्हिजन असल्याचे कौतुक एकनाथ शिंदेंनी केले, तर डोंबिवलीत उभारण्यात आलेले प्रेरणा वॉर मेमोरियल रत्नागिरीतही उभारणार असल्याचे सामंत यांनी या वेळी सांगितले.
कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठीदेखील आजवर कोट्यवधी रुपयांचा निधी आपण मंजूर केला आहे. यामुळे मतदारसंघाचा अधिक गतीने विकास होत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले, तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही कायम सुरूच राहील कोणीही बंद करू शकत नाही, अशी स्पष्टोक्तीदेखील या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
विकासाचेच राजकारण चालणार
कल्याण-डोंबिवली शहर गेल्या १० वर्षांत बदलले. २०१४ नंतर या शहरासाठी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत याची मी सुरुवात केली. कधीही राजकारणाला प्राधान्य दिले नाही. पहिल्या दिवसापासून फक्त आणि फक्त विकासकामे कशी होतील याच्यावर भर दिला. मेट्रोचे जाळे आपल्या मतदारसंघात दिसणार आहे. मेट्रो, उड्डाणपूल, शिळफाटा रस्त्याचे सहा पदरीकरण, रेल्वेच्या अतिरिक्त मार्गिका यांसारखे अनेक मोठे प्रकल्प आज मतदारसंघात उभे राहात आहेत. यामुळे आज आपले कल्याण-डोंबिवली शहर बदलत आहे, असे या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

