उंबरखिंडमध्ये उलगडला शौर्याचा वारसा

उंबरखिंडमध्ये उलगडला शौर्याचा वारसा

Published on

उंबरखिंडमध्ये उलगडला शौर्याचा वारसा
वाघरे इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल ठरली ऐतिहासिक
माणगाव, ता. ७ (वार्ताहर) ः माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सुधाकर नारायण शिपुरकर व गणेश यशवंत वाघरे, इंग्रजी माध्यम शाळेची शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी इतिहास आणि शौर्याची उजळणी देणारी ठरली. पाली-खोपोली मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय लढाईची साक्ष देणाऱ्या उंबरखिंडच्या रणभूमीला दिलेल्या भेटीत विद्यार्थ्यांनी इतिहास प्रत्यक्ष पावलांनी अनुभवला.
दरीत प्रवेश करताच विद्यार्थ्यांच्या मनात जणू काळाचा पडदा सरकला आणि २ फेब्रुवारी १६६१ रोजीचा ऐतिहासिक दिवस साक्षात त्यांच्या समोर उभा राहिला. घनदाट जंगलांच्या कुशीतील अरुंद वाटा, उंचच उंच कडे, कड्यावरून घसरत येणारे दगड आणि भीमकाय दरी, या सर्वांनी त्यांना शिवकालीन रणभूमीचा थरार प्रत्यक्ष जाणवला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उंबरखिंडची रणनीती, गनिमी काव्याचा प्रभाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सूक्ष्म बुद्धिमत्ता यांची सखोल माहिती दिली. तृतीयांश सैन्य असूनही, काहीशे मावळ्यांनी ३० हजार मोघल सैन्याला दिलेला पराभव हा रणनीती आणि दूरदृष्टीचा अनुपम नमुना असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. या लढाईचे नेतृत्व सरसेनापती नेताजी पालकरांनी बजावले होते. त्यांच्या शौर्याचा उल्लेख होताच विद्यार्थ्यांच्या अंगावर शहारे उभे राहिले.
..................
धाडसी खेळ आत्मसात
उंबरखिंडच्या खिंडीतील भूगोल कसा युद्धात महत्त्वाची भूमिका बजावतो, गनिमी काव्यातील वेग, गती आणि भूप्रदेशाचा फायदा घेणे ही तत्त्वे कशी अमलात आणली गेली, हे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहून अनुभवले. इतिहासाव्यतिरिक्त या सहलीत तिरंदाजी, प्रथमोपचार, साहसी खेळ आणि टीमवर्क वाढवणारे उपक्रम घेण्यात आले. धाडसी खेळांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला, तर नेतृत्वगुण, परस्पर सहकार्य आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित झाली. उंबरखिंडची सहल विद्यार्थ्यांसाठी जिवंत इतिहासाचे विद्यालय ठरली. शिवरायांचे धाडस, मावळ्यांचा त्याग आणि मातृभूमीवरील निष्ठेचा वारसा विद्यार्थ्यांच्या मनात अभिमानाची अविनाशी ज्योत प्रज्वलित करून गेला. ही सहल त्यांच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील, अशी सर्वांची भावना होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com