‘अवतरण’ला ‘अक्षरआनंद’ सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार प्रदान
नव्या पिढीच्या हाती मराठीचे भविष्य उज्ज्वल : अशोक बागवे
‘अवतरण’ला ‘अक्षरआनंद’ सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार प्रदान
कल्याण, ता. ७ ः ‘मराठी भाषेचे भविष्य धूसर नाही, हे आज सिद्ध झाले. नवीन पिढी साहित्याशी जोडली गेली आहे आणि त्यांच्या हाती मराठीचे भविष्य उज्ज्वल आहे. इथे दिसणारी ऊर्जा, प्रतिभा आणि संस्कार पाहून मन समाधानाने भरून आले. लहान मुलांना दिली जाणारी बक्षिसे त्यांच्या स्मृतीत इतिहासासारखी कोरली जातील. आजच्या कार्यक्रमात मला सरस्वती प्रत्यक्ष अवतरलेली दिसली,’ अशा भावना ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या.
डोंबिवलीतील आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित दिवाळी अंक स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी (ता. ६) कल्याणमध्ये पार पडला. याप्रसंगी अशोक बागवे बोलत होते. ज्ञान, विचार आणि मानवतेच्या मूल्यांचा संगम घडवणाऱ्या ‘सकाळ’च्या यंदाच्या ‘अवतरण’ दिवाळी अंकाला अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने गौरवण्यात आले. कल्याणमधील बालक मंदिर संस्था सभागृहात झालेल्या सोहळ्यात बागवे यांच्या हस्ते ‘अवतरण’ला ‘अक्षरआनंद सर्वोत्तम दिवाळी अंक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. जागतिक कीर्तीचे विक्रमवीर डाॅ. संदीप गुप्ता, प्रसिद्ध लेखिका सारिका कुलकर्णी, पुस्तक आदान-प्रदान चळवळीचे संकल्पनाकार पुंडलिक पै, अखंड वाचनयज्ञचे समन्वयक हेमंत नेहते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यंदाच्या ‘अवतरण’ दिवाळी अंकात ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ अशी संकल्पना मांडण्यात आली आहे. युद्धाच्या भयावह वास्तवाकडे पाहताना शांततेचा मानवी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केवळ संघर्षाचे परिणाम न मांडता शांतीकडे वाटचाल करणाऱ्यासाठी दिशा दाखवणारे लेख अंकाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
‘विचारांमध्ये सुसूत्रता आणायची असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही,’ असा सल्ला सारिका कुलकर्णी यांनी दिला. ‘पुरस्कार मिळो ना मिळो आविष्कार रोज सुरू राहिला पाहिजे. प्रत्येक पुस्तक एक आविष्कार आहे,’ असा वाचनाचा मूलमंत्र डाॅ. संदीप गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘युद्धाच्या अंधारातूनही शांततेची किरणे शोधणाऱ्यांवर ‘अवतरण’ने प्रकाशझोत टाकला. म्हणूनच हा सन्मान मोठा, अर्थपूर्ण आणि काळाला दिशा देणारा ठरतो,’ असे मत अखंड वाचनयज्ञ प्रतिनिधी प्रा. प्रकाश माळी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकन्या जोशी यांनी केले.
‘चांगुलपणाची चळवळ’, ‘हॅशटॅग’, ‘वाघूर’, ‘सृजन संवाद’ आणि ‘नितांत’ दिवाळी अंकांचाही कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. विशेष लक्षवेधी दिवाळी अंकाचा पुरस्कार देऊन ‘नृत्यवकाश’, ‘पत्रकार दर्पण’, ‘पसायदान’, ‘जॉय’ आणि ‘युवासूत्र’ यांना गौरवण्यात आले.
वाचनयज्ञास उत्स्फूर्त प्रतिसाद
अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे दोन दिवस बालक मंदिर संस्थेत सलग ३६ वाचनयज्ञ सादर करण्यात आला. त्यानिमित्त विविध विभागांत झालेल्या वाचनसत्रांना शालेय विद्यार्थ्यांसह पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
फोटो कॅप्शन
कल्याण ः ‘अवतरण’ला जाहीर झालेला ‘अक्षरआनंद सर्वोत्तम दिवाळी अंका’चा पुरस्कार ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या हस्ते ‘सकाळ’चे सहाय्यक वृत्तसंपादक सुशील आंबेरकर यांनी स्वीकारला. सोबत डाॅ. संदीप गुप्ता, सारिका कुलकर्णी, पुंडलिक पै आणि हेमंत नेहते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

