बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर दंडात्मक कारवाईचा बडगा
बाइक टॅक्सी सेवांवर दंडात्मक कारवाई
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कल्याण आरटीओचा बडगा
कल्याण, ता. ७ (वार्ताहर) : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या बेकायदेशीर बाइक टॅक्सी सेवांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनी कल्याणच्या हद्दीत विनापरवाना व्यावसायिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ‘रॅपिडो’ कंपनीच्या ४७ दुचाकीचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
कल्याण आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बाइक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. कल्याण आणि आसपासच्या परिसरात आवश्यक व्यावसायिक परवान्याशिवाय बाइक टॅक्सींच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
दंड वसूल
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी सांगितले की, व्यावसायिक प्रवासी वाहतुकीची परवानगी नसलेल्या या दुचाकीस्वारांकडून एक लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांकडून सातत्याने येत असलेल्या तक्रारींमुळे या कारवाईला वेग आला. आरटीओने केवळ वैयक्तिक चालकांवरच नव्हे, तर या बेकायदेशीर कामात गुंतलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या खासगी कंपनीवरही कठोर कायदेशीर पाऊल उचलले आहे. मोटार वाहन निरीक्षक सुप्रिया गावडे यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात ‘दि रुपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ (रॅपिडो) आणि तिच्या संचालकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
गुन्ह्याच्या नोंदीनुसार, कंपनी जानेवारी २०२५ पासून व्यावसायिक परवान्याशिवाय ऑनलाइन नोंदणीद्वारे प्रवाशांना सेवा पुरवत होती. हे कृत्य बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीच्या कक्षेत येते आणि यामुळे सरकारी महसूलाचेही नुकसान झाले.
सेवांचा वापर टाळा
आशुतोष बारकल यांनी स्पष्ट केले की, मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ६६ नुसार, रॅपिडोसह, ओला आणि उबर यासारख्या सर्व खासगी कंपन्यांना दुचाकी वाहने प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यापूर्वी व्यावसायिक परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यांनी सांगितले की, परवानगीशिवाय पेट्रोलवर चालणाऱ्या बाइक्स प्रवासी सेवेसाठी वापरणे हा कायद्याचा भंग आहे. विहित नियमांची पूर्तता केल्यानंतरच अशा कंपन्यांना कायमस्वरूपी परवाने दिले जातील. नागरिकांना बेकायदेशीर बाइक सेवांचा वापर करणे टाळावे. कारण परवाना आणि परमिट नसलेले हे चालक केवळ कायद्याचे उल्लंघन करत नाहीत, तर ते प्रवाशांच्या जीवितासाठी आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठीही धोकादायक ठरू शकतात, असे आवाहन बारकल यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

