अंबरनाथमध्ये हवेची गुणवत्ता खालावली
अंबरनाथमध्ये हवेची गुणवत्ता खालावली
धुळीमुळे प्रदूषणाचा धोका वाढला
अंबरनाथ, ता. ८ : अंबरनाथ शहरातील हवा गुणवत्ता ‘अस्वस्थ’ श्रेणीत पोहोचली असून, प्रदूषणाची पातळी आता मुंबई आणि ठाण्यासारख्या महानगरांच्या जवळपास आहे. धूळ आणि वायू प्रदूषणामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, अशी चिंता व्यक्त होत आहे. प्रदूषण वाढण्यास मुख्यत्वे एमआयडीसी परिसरातील रासायनिक कारखाने कारणीभूत आहेत. वारंवार होणारे अपघात, विषारी वायुगळती आणि रस्त्यांवरील बांधकाम व वाढत्या वाहतुकीमुळे शहरात धूळ आणि धुराचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.
हवेतील वाढत्या धूलिकणांमुळे रहिवाशांना श्वसनाचे विकार, खोकला, दम लागणे आणि डोळे चुरचुरणे यांसारख्या समस्या सतत भेडसावत आहेत. कल्याण-कर्जत महामार्गावरील वाढती रहदारी, रस्त्यांवरील खड्डे, वाहनांचा धूर आणि रस्त्यावर साचलेले बांधकाम साहित्य व कचऱ्याचे ढिगारे यामुळे हवेतील धूळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही वर्षांत औद्योगिक वसाहतीत अनेक गंभीर दुर्घटना घडल्या आहेत, ज्यामुळे कामगारांची सुरक्षा आणि पर्यावरणीय प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सप्टेंबर आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये वायुगळती व स्फोटाच्या घटनांमुळे कामगार जखमी झाले होते. यापूर्वी २७ मार्च २०२१ रोजी विषारी वायूमुळे गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाला होता.
१३ कंपन्या बंद करण्याचे आदेश
नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जयंत कदम यांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करून रात्रीच्या वेळी रासायनिक वायू हवेत सोडणाऱ्या मोरीवली आणि चिखलोली एमआयडीसीतील एकूण १३ कंपन्यांना त्यांनी तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
आरोग्यतज्ज्ञांची गंभीर चिंता
आरोग्यतज्ज्ञ डॉ. मनोज कंदोई यांनी या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, कारखान्यांचे उत्सर्जन, वाहनांचा धूर आणि बांधकामांमुळे निर्माण होणारे पीएम २.५ सारखे सूक्ष्म कण फुप्फुसांपर्यंत खोलवर जात आहेत. या विषारी कणांमुळे दमा, ब्राँकायटिस, फुप्फुसांचा कर्करोग यांसारख्या आजारांची संख्या वाढत आहे. इतकेच नव्हे तर, हे कण रक्तात मिसळून हृदयविकार, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका २०-३० टक्क्यांनी वाढवत आहेत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
कायमस्वरूपी उपायांची गरज
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नगर परिषद तातडीने रस्त्यांचे डांबरीकरण, धूळरोधक उपाय आणि बांधकाम नियमांचे कठोर पालन यांसारखी पाऊले उचलू शकते, मात्र तज्ज्ञांच्या मते, भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी एमआयडीसीतील उद्योगांच्या सुरक्षा व्यवस्थेचे सशक्तीकरण करणे आणि शहरात पर्यावरणीय प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

