एसटी प्रवाशी कासावीस
एसटी प्रवासी कासावीस
आगारांमध्ये पाणी नाही; कॅन्टीन गायब
राजीव डाके : सकाळ वृत्त सेवा
ठाणे शहर, ता. ८ : पिण्यासाठी स्वच्छ पाणी हा सर्वांचा अधिकार आहे; मात्र ठाणे विभागीय एसटी महामंडळ प्रवाशांना या हक्कापासून वंचित ठेवत असल्याचे संतापजनक चित्र उघडकीस आले आहे. ठाणे स्थानक, खोपट आगार क्रमांक १ आणि वंदना आगारातील शुद्ध पाण्याच्या पाणपोई बंदावस्थेत असल्याने आगारातील प्रवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या आगारातून महिन्याला सात लाखांहून अधिक लोक प्रवास करतात, तर अधिकारी, कर्मचाऱ्यांनादेखील जादा दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे. काही वर्षांपूर्वी प्रत्येक एसटी आगारात दिसणारी एसटीची कॅन्टीनदेखील गायब झाल्याने एसटी महामंडळाचा प्रवाशांप्रतीचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
एसटी महामंडळाच्या प्रत्येक आगारात प्रवाशांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी आणि जेवणासाठी हमखास कॅन्टीन असायची. एसटीने लांब पल्ल्याचा प्रवास केला जात असल्याने प्रवाशांना पाणी आणि जेवणाची अत्यंत आवश्यकता असते, शिवाय एसटीने प्रवास करणारा प्रवासी सामान्य वर्गातला असल्याने त्याच्यासाठी या सुविधा आवश्यक आहेत. ही गरज लक्षात घेता एसटी महामंडळाकडून प्रत्येक आगारात कॅन्टीन आणि पाण्याची सुविधा निर्माण केल्या जात होत्या. अनेक ठिकाणी या सुविधा असल्या तरी ठाण्यातील बहुतांश आगारातून त्या गायब झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना महागड्या हॉटेल अथवा आगार परिसरात अतिक्रमण करून लावण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरून तहान, भूख आणि चहाची गरज भागवावी लागत आहे. आगारात असलेल्या जागेत अशा सुविधा पुन्हा उभ्या करून एसटीचा आर्थिक लाभ वाढविण्याऐवजी अतिक्रमण करणाऱ्यांना रान मोकळे देऊन त्यांना आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा करून देताना दिसत आहे.
वंदना आगारात काही वर्षांपूर्वी शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याची पाणपोई होती. तसेच जवळच विभागीय कार्यलयात जेवण, चहापान करण्यासाठी कॅन्टीन अस्तित्वात होती; मात्र आता या ठिकाणी या दोन्ही सुविधा बंदवस्थेत आहेत. खोपट आगार क्रमांक १ येथे प्रवेश द्वाराजवळ कॅन्टीन आणि पाणपोईची सुविधा होती, तीदेखील आता तेथून गायब आहे. एसटीच्या कॅन्टीनमध्ये वाहतूक नियंत्रणाचे काम केले जाते.
वाहिनी अनेक वर्षांपासून बंद
ठाणे रेल्वेस्थानक आगारातील पाणपोई अनेक वर्षे ती बंद आहे. या ठिकाणाहून मोठ्या संख्येने ठाणे, पालघर जिल्ह्याच्या गाव-पाड्यांतील बहुतांश आदिवासी प्रवासी प्रवास करतात; मात्र त्यांना या आगारात पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. पाणी प्यायचे असेल, तर येथील हॉटेलमध्ये जाऊन आधी खाद्यपदार्थांची खरेदी करावी लागते, तर आगारातील अधिकारी, कर्मचारी यांनादेखील पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यासाठी एसटीचा खर्च होत असल्याचे समजते, तर आगारातील हॉटेलमध्ये पालिकेचे २४ तास पाणी आहे; मात्र एसटीला देण्यात आलेली वाहिनी अनेक वर्षांपासून बंद आहे.
रोजची प्रवासीसंख्या
वंदना, खोपट आगार प्रवासीसंख्या सुमारे - ७०००
ठाणे स्थानक प्रवासी सुमारे - १५०००
फोटो : विभाग कार्यालयात असलेली कॅन्टीन बंद आहे.
वंदना आगारात स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणारी पाणपोई बंद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

