स्मशानभूमीचा धूर घराघरांत

स्मशानभूमीचा धूर घराघरांत

Published on

नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ८ : मृत्यूला शेवटचा निरोप देणाऱ्या स्मशानभूमीचा धूर आता जिवंतांच्या श्वासांवरच संकट बनून बसला आहे. उल्हासनगरच्या व्हिनस चौकजवळील स्मशानभूमीतून सातत्याने उठणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचे जीवन त्रासदायक झाले आहे. घराघरांत धूर शिरल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धुराचे लोट आणि जळक्या लाकडांचा तीव्र वास यामुळे परिसरातील वातावरण असह्य झाले आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीत एकूण चार स्मशानभूमी आहेत. सर्व ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मृतदेहाचे दहन केले जाते. एका मृतदेहाच्या दहनासाठी अंदाजे ४५० ते ५०० किलो लाकडांचा वापर केला जात असल्याने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो. धूर नियंत्रित करण्यासाठी आवश्यक चिमणी व्यवस्था व धूर शुद्धीकरण यंत्रणा उपलब्ध नसल्याने हा धूर थेट आसपासच्या निवासी भागात मिसळतो. परिसरातील रहिवाशांच्या मते, धूर इतका तीव्र असतो की बाल्कनीत उभे राहणे, खिडक्या उघडणे किंवा मुलांना बाहेर खेळू देणेही कठीण झाले आहे. जळजळ, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी, तसेच दमा व ॲलर्जी अशा तक्रारी वाढल्या आहेत. धूर घरात सतत येत असल्याने वृद्ध, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर याचा सर्वाधिक परिणाम होत आहे.
नागरिकांनी यापूर्वी तक्रारी, अर्ज व पाठपुरावा केला तरीही महापालिकेकडून धूर नियंत्रणाबाबत कोणतीच ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. रहिवासी भाग स्मशानभूमी परिसरातच वाढत असल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. पर्यावरण आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अशा प्रदूषणाचा दीर्घकाळ संपर्क राहिल्यास फुफ्फुसविकार, हृदयविकार आणि श्वसनाचे आजार वाढण्याचा धोका अधिक असतो. वाढत्या धुराच्या तक्रारींचा विचार करता महापालिकेकडून त्वरित निर्णय आणि कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्वच्छ हवा व सुरक्षित पर्यावरणाचा हक्क नागरिकांना मिळालाच पाहिजे, अशी एकमुखी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

===============================

नागरिकांच्या मागण्या
१) सर्व स्मशानभूमींमध्ये चिमणी व धूर शुद्धीकरण यंत्रणा बसवावीत
२) इलेक्ट्रिक/गॅस दहन व्यवस्था सुरू करावी
३) प्रशासनाने सार्वजनिक आरोग्य सुरक्षा उपाय तातडीने राबवावेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com