अक्षरमंच प्रतिष्ठानचा अखंड वाचनयज्ञ उपक्रमाला उदंड प्रतिसाद

अक्षरमंच प्रतिष्ठानचा अखंड वाचनयज्ञ उपक्रमाला उदंड प्रतिसाद

Published on

सजग दृष्टी वाचनामुळे मिळते ः अशोक बागवे
अक्षरमंच प्रतिष्ठानच्या अखंड वाचनयज्ञ उपक्रमाला उदंड प्रतिसाद
कल्याण, ता. ८ (बातमीदार) : डोळ्यांना चष्मा लागतो पण दृष्टीला कधी चष्मा लागत नाही. सजग डोळ्यांनी आपण आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांकडे पाहिले पाहिजे आणि ही दृष्टी वाचनामुळे आपल्याला मिळते. मराठी भाषेचे भविष्य धूसर नाही, हे आज ‘अखंड वाचन यज्ञ’सारख्या उपक्रमांमुळे सिद्ध झाले आहे. आजच्या कार्यक्रमात मला सरस्वती प्रत्यक्ष अवतरलेली दिसली, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे यांनी केले. अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने सलग ३६ तास अखंड वाचन यज्ञाचा समारोप झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
वाचन आपल्या जाणिवा समृद्ध करते. इतर माध्यमांपेक्षा वाचनामध्ये अनेक गोष्टींचे वेगळेपण आढळते. स्मरणशक्ती व निरीक्षणशक्ती वाचनामुळे वाढीला लागते. वाचनामुळे शब्दसंपत्ती वाढीला लागून आपल्या भाषेचे सौंदर्य वाढते, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध लेखिका सारिका कुलकर्णी यांनी केले. वाचन करू नये किंवा वाचनाचा उपयोग नाही, असे मानणाऱ्या लोकांवर त्यांनी आपल्या नर्म विनोदी शैलीत टीका करून वाचनाचे महत्त्व विविध उदाहरणांच्या माध्यमातून विशद केले.
याप्रसंगी जागतिक कीर्तीचे विक्रमवीर डॉ. दिनेश गुप्ता यांनी सांगितले, की पुरस्कार मिळो किंवा न मिळो आपण आपल्यातील सृजनतेचा आविष्कार सातत्याने सुरू ठेवला पाहिजे. प्रत्येक पुस्तक त्याची निर्मिती आणि वाचन हा एक आविष्कार आहे.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हेमंत नेहते, मंदार धर्माधिकारी, डॉ. सुनील खर्डीकर, दया भिडे, प्रा. शैलेश रेगे, प्रा. गजेंद्र दीक्षित, गीता जोशी, पुंडलिक पै, आरती मुळे, भालचंद्र घाटे, मुग्धा घाटे, तुषार राजे, प्रा. प्रकाश माळी, निखिल बल्लाळ, मीनल जोशी, कैलास सरोदे, प्रदीप जोशी, मच्छिंद्र कांबळे, रवींद्र कनोजे यांनी सहकार्य केले. तर या उपक्रमासाठी कोकणमेवा योजक, खर्डीकर क्लासेस, जोशी फायनान्शिअल सर्व्हिसेस, पै फ्रेंड्स लायब्ररी, सुस्वर क्रिएशन्स, माउली एक शैक्षणिक ध्यास, साहित्यसंपदा, आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था यांचे विशेष सहकार्य लाभले.

वाचन यज्ञात दोन हजार ४५२ वाचकांचा सहभाग
अखंड वाचन यज्ञात वय वर्ष सहा ते ८२ अशा विविध वयोगटांतील दोन हजार ४५२ वाचकांनी भारताचार्य चिंतामणराव वैद्य वाचन कट्टा, डॉ. जयंत नारळीकर वाचनकट्टा, बाळ कोल्हटकर वाचनकट्टा या व्यासपीठावरून वाचन केले. एकूण ६५ सत्रांमध्ये झालेल्या या उपक्रमात २० सामाजिक व संस्कृतिक संस्था आणि २६ शाळांचा सहभाग होता. या उपक्रमात मराठी भाषेप्रमाणे हिंदी, इंग्रजी, गुजराती, आगरी कोळी, अहिराणी अशा विविध भाषा आणि बोलीतील कथा, कविता, एकांकिका, स्फुटलेखन यांचे वाचन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com