पर्यटन नगरीला ग्रहण

पर्यटन नगरीला ग्रहण

Published on

पर्यटन नगरीला ग्रहण
घारापुरी बेटाकडे पर्यटकांची पाठ, रोजगारावर परिणाम
सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ : मुंबईजवळील ऐतिहासिक घारापुरी (एलिफंटा) बेटावर वर्षभरापासून पर्यटकांची संख्या रोडावली आहे. कोविड, समुद्री सुरक्षेसंबंधी प्रश्नांबरोबर येथील सांस्कृतिक फेस्टिव्हल बंद पडल्याने पर्यटनाला लागलेल्या ग्रहणाने स्थानिकांचा रोजगार बुडला आहे.
घारापुरी बेट हे समुद्रात चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. या बेटाजवळ जेएनपीए आणि भाभा अणुभट्टी असे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. या बेटावर काळ्या दगडात कोरलेल्या लेण्या पर्यटकांसाठीचे आकर्षण राहिले आहे. बेटाचा वापर ब्रिटिश काळात पाहणीसाठी वापरला जात होता. त्याकाळात वेगळ्या बनावटीच्या फिरत्या तोफा पर्यटकांना आकर्षण बिंदू ठरत आहेत. बेटावर एक धरण आणि तीन गावे आहेत. या गावांना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. लेण्या, तोफा या व्यतिरिक्त सरकारने या बेटावर पर्यटकांच्या दृष्टीने कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत. बेटाच्या सभोवताली असणाऱ्या कांदळवनांमध्ये हजारो टन प्लॅस्टिकचा कचरा अडकल्याने पर्यावरण संकटात आले आहे, तर बेटावर जाण्यासाठीच्या जेट्टीची दुरवस्था झाली असून, पथदिवे बंद असल्याने काळोखातून चालण्याची वेळ पर्यटकांवर आली आहे, तर बेटावर पर्यटनाव्यतिरिक्त दुसरा रोजगार नसल्याने येथील हॉटेल, दुकानदार व्यावसायिकांचा रोजगार धोक्यात आला आहे.
-----------------------------------------------
२०१९ नंतर घसरण
२०१० ते २०१९ या काळात एलिफंटा गुंफांना देशी, परदेशी पर्यटकांची मोठी गर्दी होती. २०१९ मध्ये पर्यटकांची संख्या सर्वाधिक नोंदली गेली होती, मात्र २०२० पासून परिस्थिती बदलली. लॉकडाऊन, समुद्री मार्गावरील मर्यादांमुळे पर्यटकांनी घारापुरीला भेट देण्याचे बंद केले आहे.
२०१९ : ७.२ लाख देशी पर्यटक
२०२१ : ८२ हजार
२०२३-२४ : प्रवासीसंख्या वाढली असली तरी अद्याप २०१९ च्या तुलनेत खूपच कमी.
-------------------
मासिक उत्पन्न घटले
घारापुरी बेटावरील बहुतेक कुटुंबे पर्यटनावर अवलंबून आहेत. फेरीबोट कर्मचारी, स्थानिक गाईड्स, दुकानदार, स्टॉलधारक, हस्तकला विक्रेते या सर्वांची कमाई पर्यटनावर चालते. पर्यटकांची संख्या कमी झाल्याने अनेकांच्या हातावर पोट आले आहे. अनेकांचे मासिक उत्पन्न ६० ते ७० टक्क्यांनी घटले असून, काही दुकानांचा व्यवसाय कायमचा बंद झाला आहे.

एलिफंटा फेस्टिव्हल बंद
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)तर्फे घारापुरी बेटावर भरणारा एलिफंटा महोत्सव आकर्षणाचे केंद्र होते. या फेस्टिव्हलमुळे बेटावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत होते. स्थानिक व्यवसायांना चांगली चालना होते, पण २०१९ नंतर हा महोत्सव बंद पडला. त्यामुळे घारापुरी बेटाचे आकर्षण कमी झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
--------------------------
अपघातांच्या घटनांमुळे भीती
घारापुरी मार्गावर काही वर्षांत घडलेल्या बोट अपघातांनी पर्यटकांची भीती वाढवली आहे. अलीकडेच झालेल्या एका मोठ्या घटनेत बोटीचे नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडली. त्यामुळे मुंबई-एलिफंटा मार्गावरील समुद्री सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. या अपघातानंतर समाजमाध्यमांवर समुद्र मार्गाने प्रवास करण्यासंबंधी भीती व्यक्त केली गेल्याने त्याचा थेट परिणाम घारापुरी बेटावरील पर्यटनावर झाला आहे.
--------------------------------------------------------
एलिफंटा बेटाच्या अर्थव्यवस्थेचा पर्यटन हा कणा आहे. पर्यटक कमी झाल्याने अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. स्थानिक प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा, जनजागृती तसेच पर्यटनाला चालना देणारे उपक्रम राबवणे अत्यावश्यक आहे.
- सुरेश पाटील, स्थानिक हॉटेल व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com