शिवरायांनी मुघलांना धुळ चारलेल्या उंबरखिंडीत मिसिंग लिंकचा महाकाय केबल स्टे ब्रीज

शिवरायांनी मुघलांना धुळ चारलेल्या उंबरखिंडीत मिसिंग लिंकचा महाकाय केबल स्टे ब्रीज

Published on

प्रतिकूल हवामान मिसिंग लिंकच्या केबल स्टे ब्रिजची उभारणी
शिवरायांनी मुघलांना धूळ चारलेल्या उंबरखिंडीतील काम अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडच्या खालापूर तालुक्यातील चावणी येथील उंबरखिंडीत प्रतिकूल हवामान असतानाही आपल्या मूठभर मावळ्यांच्या मदतीने मुघलांना धूळ चारली होती. त्याच इतिहासातून प्रेरणा घेत ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे अभियंते आणि कर्मचारी ऊन, वारा, धुके आणि पावसाचा सामना करीत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकचा महाकाय केबल स्टे ब्रिज उभारत आहे. याची उंची जमिनीपासून १३२ मीटर असून, देशातील सर्वात उंचीवरील रोड केबल-स्टेड ब्रिज आहे. खोल दरीवरील केबल स्टे ब्रिजची जोडणी झाल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत असल्याने खंडाळा घाटात नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका असल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) खंडाळा घाटात १३.३ किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवासाची वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे. या मार्गावर बोगदे आणि केबल स्टे ब्रिज असणार आहेत. त्यापैकी केबल स्टे ब्रिजचे काम ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून केले जात आहे. या ठिकाणी वेगाने वाहणारे वारे, ऊन, धुके, पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीत कंपनीचे अभियंते, कर्मचारी अविश्रांतपणे काम करीत असून, या पुलाच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्याने दिली.

भौगोलिक परिस्थिती आव्हानात्मक
मिसिंग लिंकच्या केबल स्टे ब्रिजच्या उभारणीत भौगोलिक परिस्थिती आव्हानात्मक आहे. अरुंद कडे, तीव्र उतार, दाट धुके आणि ताशी १०० किमी वेगाने वाहणारे वारे अशा परिस्थितीत काम सुरू आहे. अनेकदा मंद वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग अचानक वाढतो; तेव्हा काम करणे दूरच पण उभा राहणेही कठीण होते, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.


उंबरखिंडची लढाई
- २ फेब्रुवारी १६६१ला आंबेनळी घाट परिसरात उंबरखिंड येथे लढाई लढली गेली.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूठभर मावळ्यांनी कारतलब खानाच्या ३० हजार मुघल सैन्याचा पराभव केला.
- अरुंद घाटात सापळा रचून भूभागाचा रणनीतीने वापर
- डोंगराळ भागातील युद्धकौशल्याच्या आधारे ही लढाई शिवरायांनी जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com