महायुतीच्या चर्चेने इच्छुक धास्तावले

महायुतीच्या चर्चेने इच्छुक धास्तावले

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ ः नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेत पुन्हा एकदा महायुतीचे सूर जुळण्याचे संकेत मिळाले आहेत. मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका महायुती म्हणून लढवण्यावर एकमत झाल्याचे समजते; मात्र या चर्चांच्या गुऱ्हाळ्यात उमेदवारीसाठी डोळे लावून बसलेल्या इच्छुकांच्या अपेक्षांचा ‘पिचड’ होण्याची भीती वाढली आहे. जागावाटपात आपला पत्ता कापला जाणार नाही ना, या चिंतेने माजी नगरसेवकांसह इच्छुक चांगलेच धास्तावले आहेत.

केंद्रासह राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती आहे; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तीन पक्षांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत. भाजप आणि शिवसेनेमधील ही दरी अधिक वाढली असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच जिल्ह्यात घेरण्यासाठी भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ सुरू केले. त्यानंतर वनमंत्री गणेश नाईक, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मैदानात उतरले. ठाण्यात भ्रष्टाचाराचा मुद्दा हाती घेतला, तर कल्याण, डोंबिवलीत शिंदे गटात फोडाफोडी सुरू केली. परिणामी, दोन्ही पक्षांनी ठाणे जिल्ह्यातील बहुतेक सर्वच महापालिकांमध्ये स्वबळाचा नारा दिला.

स्वबळाच्या हालचालीमुळे स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या आशाअपेक्षा वाढल्या. ठाणे महापालिकांचा विचार केला असता १३३ पैकी शिवसेनेचे गेल्या निवडणुकीत ६६ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सुमारे ६० माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटाकडे आहेत. तर पक्षप्रवेशांच्या धडाक्यानंतर ही संख्या ८० ते ८५च्या पुढे गेली आहे. याशिवाय घराणेशाहीतील पुढची पिढी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, अशी डझनभर नावे आहेत. तिकीट मिळेल, या आशेवर प्रभाग बांधणारे डझनभर इच्छुकांचीही गर्दी आहे. म्हणजे एकट्या शिंदे गटातच आजच्या घडीला दीडशे उमेदवार निडणुकीसाठी सज्ज आहेत.

भाजपतही तीच अवस्था आहे. ठाणे महापालिकेत भाजपने स्वबळाचा नारा दिला होता. त्या दृष्टीने माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांची मोट बांधण्यास सुरुवात झाली आहे. सध्यातरी ‘ऑपरेशन ५५’ इतकीच मर्यादा त्यांनी स्वत:ला आखून ठेवली आहे; पण महायुती झाल्यास जागावाटपाचे हे गणित जुळवताना पक्षांची खरी कसोटी लागणार आहे.

अनेकांच्या नावांना कात्री?
शिवसेना शिंदे गटाकडे आजच्या घडीला ८५ माजी नगरसेवक आहेत, तर भाजपने ५५ नगरसेवक निवडून आणण्याची तयारी केली आहे. ही संख्याच १४०च्या पुढे जात आहे. याशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत असल्याने त्यांच्यासाठीही जागा सोडाव्या लागणार आहेत. महायुती झाल्यास जागावाटपात अनेकांच्या नावांना कात्री लागण्याची शक्यता आहे.

ठाण्यात भाजप सत्ता चाखणार
मुंबईत शिवसेना शिंदे गटाशिवाय पालिका निवडणूक जिंकणे अशक्य असल्याने भाजपने एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी मुंबईत महायुती म्हणून लढताना इतर महापालिकांमध्ये विरोधात लढणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळेच उर्वरित महापालिकांमध्येही महायुतीवर चर्चा झाल्याचे कळते; मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिंदेंना फटका बसण्याची शक्यता आहे.

भाजपला स्थानिकांचा विरोध
बहुमत निवडून आणण्याची ताकद शिंदे गटाकडे आहे. महायुती झाल्यास सत्तेमध्ये भाजपला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटालाही वाटा द्यावा लागणार आहे. राष्ट्रवादी चालेल; पण भाजप सत्तेत पुन्हा नको, अशी भावना शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

महाविकास आघाडीला मिळणार बळ
महायुती झाल्यास मविआला बळ मिळणार असल्याचे भाकीत भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. महायुतीच्या जागावाटपात तिकीट मोठ्या संख्येने कापण्यात येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नाराज गट मविआच्या गळाला लागतील, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com