दुबार मतदारांसाठी अर्ज प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर दुबार मतदारांचा विषय चांगलाच गाजत आहे. त्यात आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावरून महाविकास आघाडीने आरोपांच्या फैरी झाडत आंदोलने केली, तर दुसरीकडे मोर्चादेखील काढण्यात आला होता. यानंतर आता पालिका हद्दीत ८३ हजार ६४४ दुबार नावे असल्याचे जाहीर केले आहे. या मतदारांना मतदानापासून रोखण्यासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार दोन ठिकाणी नावे असलेल्या मतदारांनी त्यांना कोणत्या ठिकाणी मतदान करायचे आहे, त्यासंदर्भात अर्ज भरून द्यावा लागणार आहे.
ठाणे महापालिकेकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप यादी जाहीर केली. त्यानंतर या यादीवरती हरकती, सूचना दाखल करण्यासाठी दिलेल्या कालावधीत पालिकेला २५० हून अधिक हरकती, सूचना प्राप्त झाल्या. या आधीही मतदार यादीतील गोंधळावरून मनसेने दोनदा महापालिकेचे लक्ष वेधले होते. या यादीत नवी मुंबईतील नावे असल्याचे उदाहरणही मनसेने पुढे आणले होते. यानंतर माजी खासदार राजन विचारे यांनी पुराव्यानिशी दुबार नावे उघड करत महापालिकेला चांगलेच धारेवर धरले. त्यातच दुसरीकडे पालिकेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर संभाव्य दुबार नावांची स्वतंत्र यादी जाहीर करून चुकीला दुजोरा दिला आहे. या नावांमध्ये समान नावामुळे झालेला गोंधळ, फोटो उपलब्ध नसणे, तसेच एकाच नावाच्या दोन भिन्न व्यक्तींचा समावेश अशा विविध कारणांमुळे झालेल्या त्रुटींचा समावेश असल्याचे महापालिकेच्या माहितीत म्हटले आहे.
दुसरीकडे आता महापालिकेने ज्यांनी दुबार नावे असतील, त्यांनी प्रभाग समिती कार्यालयामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रभाग समितीमध्ये अर्ज ठेवण्यात आले आहेत. त्या अर्जावर दुबार मतदार कोणत्या ठिकाणी मतदार करणार आहे, हे त्याने भरून द्यावे लागणार आहे. त्यानुसार त्याला एकाच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार असणार आहे.
त्यानंतरच मतदान करता येणार!
जे अर्ज भरणार नाहीत, त्यांची मतदानाच्या दिवशीची डोकेदुखी वाढणार आहे. अशा मतदारांच्या नावापुढे मतदान यादीमध्ये दुबार असा शिक्का मारला जाणार आहे. त्यामुळे त्यांना मतदानाचादेखील अधिकार राहणार नसल्याचे सांगितले जात आहे, परंतु मतदानाच्या दिवशी असा व्यक्ती मतदानासाठी आला, तर त्याचे जागेवर हमीपत्र भरून घेतले जाणार आहे. एकाच ठिकाणी तो मतदान करणार असल्याचे त्यांनी लिहून द्यायचे आहे. त्यानंतर त्याला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे.
१६ लाख ४९ हजार मतदार
ठाणे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर २० नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. २०१७ च्या निवडणुकीमध्ये १२ लाख २८ हजार ६०६ मतदारांची संख्या होती. आता मतदारांची ही संख्या तब्बल चार लाख २१ हजार २६१ ने वाढली आहे. महापालिकेच्या माहितीनुसार मतदारांची संख्या १६ लाख ४९ हजार ८६७ झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

