देवगंधर्व महोत्सवातून कल्याणकरांना मिळणार शास्त्रीय संगीताची मेजवानी

देवगंधर्व महोत्सवातून कल्याणकरांना मिळणार शास्त्रीय संगीताची मेजवानी

Published on

देवगंधर्व महोत्सवातून कल्याणकरांना मिळणार शास्त्रीय संगीताची मेजवानी
कल्याण गायन समाजाच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : शास्त्रीय संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी कल्याण गायन समाजाच्या वतीने १२ ते १४ डिसेंबर यादरम्यान कल्याणातील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात देवगंधर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. कल्याण गायन समाज आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विशेष सहकार्याने हा देवगंधर्व महोत्सव होणार आहे. या पत्रकार परिषदेला आयुक्त अभिनव गोयल, शताब्दी समितीचे ॲड. शैलेंद्र जल्लावार, गायन समाज संस्थेचे राम जोशी, प्रशांत दांडेकर, महेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कल्याण गायन संस्था गेल्या २३ वर्षांपासून या देवगंधर्व महोत्सवाचे आयोजन करत आहे. कल्याण गायन समाजाच्या शताब्दी वर्षामध्ये होणारा यंदाचा देवगंधर्व महोत्सव विशेष उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत अत्रे रंगमंदिर येथे होणाऱ्या या महोत्सवाचे २४वे वर्ष म्हणजेच रौप्यमहोत्सवी टप्पा असून, संगीतप्रेमींसाठी ही एक अद्वितीय सांगीतिक मेजवानी ठरणार आहे. संगीताचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या महोत्सवाच्या प्रवेशिका सवलतीच्या दरात देण्यात येणार असल्याचेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे हे कल्याण गायन समाजाला शताब्दी समितीचे अध्यक्ष म्हणून लाभले असून, टाटा समूहातील उच्चपदस्थ माधव जोशी आणि युरॉलॉजिस्ट डॉ. नंजप्पा यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. कल्याण गायन समाजचे अध्यक्ष प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप जाधव आहेत.

‘संगीत ययाती-देवयानी’ नाटक सादर करणार
या वर्षीच्या देवगंधर्व महोत्सवात दिग्गज कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. पं. व्यंकटेश कुमार, उस्ताद शाहिद परवेझ, पं. राकेश चौरसिया, डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे तसचे तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या संकल्पनेतील ‘तालयात्रा’ कार्यक्रमासह स्थानिक कलाकारांनी बसवलेले ‘संगीत ययाती-देवयानी’ हे नाटकही महोत्सवाची शोभा वाढवणार आहे.


कलासंकुल सुरू करण्याचा मानस
खडकपाडा आणि परिसरात कल्याण शहराचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या भागातील रहिवाशांसाठी एक नवीन कलासंकुल सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेतच. शिवाय कल्याणात एक अद्ययावत रेकॉर्डिंग स्टुडिओ सुरू करण्याचाही कल्याण गायन समाजाचा मानस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com