पेण–खोपोली मार्गाची दुरवस्‍था

पेण–खोपोली मार्गाची दुरवस्‍था

Published on

पेण-खोपोली मार्गाची दुरवस्‍था
नांदाडी फाटा ते सावरसईदरम्यान धुरळा, खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त
पेण, ता. ९ (वार्ताहर) ः पेण-खोपोली राज्यमार्गावरील नांदाडी फाटा ते सावरसई हा महत्त्वाचा टप्पा गेल्या काही महिन्यांपासून अतिशय दयनीय अवस्थेत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रस्त्यावरील खडी बाहेर पडल्याने धुरळ्यामुळे वाहनचालक त्रस्‍त झाले आहेत. शिवाय, उडणारी खडी वाहनांना धडकत असून अपघातही घडत आहेत.
पेण-खोपोली राज्यमार्गाचे चौपदरीकरण चांगल्या पद्धतीने झाले असले तरी पेण हद्दीतील अनेक टप्पे अर्धवट अवस्थेतच अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळते. नांदाडी-सावरसईसह कामार्लीपासून पुढे गागोदे ते आरावपर्यंत रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा केली आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून, रस्त्यावरची खडी सैल पडल्याने प्रवास अधिक धोकादायक झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना वारंवार अपघातांचा सामना करावा लागत आहे. काही सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर या मार्गातील काही भागांचे काम सुरू झाले असले, तरी नांदाडी फाटा-सावरसई टप्पा मात्र पूर्णत: दुर्लक्षित राहिला आहे. या भागात सर्वत्र धुळीचे साम्राज्य असून स्थानिकांना घराबाहेर पडतानाच अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकरी, विद्यार्थ्यांचे वाहन, एसटी बस, खासगी प्रवासी सर्वांनाच धुरळा आणि खडीच्या फेऱ्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे येथील स्‍थानिक कार्यकर्ते मयूर वनगे यांनी सांगितले. वनविभागाच्या कारणास्तव हा टप्पा काही काळ प्रलंबित असल्याचे समोर आले असून, त्यावर तोडगा काढून काम पूर्ण करण्याची तातडीची गरज आहे. नागरिकांच्या जीविताचा प्रश्न असल्याने वनगे यांनी आता विलंब नको, त्वरित दुरुस्ती करा, असे प्रशासनाला आवाहन केले आहे.
...............
प्रशासनाकडून कार्यवाहीचे आश्वासन
यासंदर्भात पेणचे कार्यकारी अभियंता विक्रम शिगवण यांनी विचारणा केली असता त्‍यांनी सांगितले, की पेण-नांदाडी फाटा ते सावरसई हा रस्त्याचा टप्पा वनविभागाच्या कारणामुळे थांबलेला होता; मात्र हा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल आणि रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल, त्‍यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलून हा महत्त्वाचा मार्ग सुरळीत करावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com