‘ईव्ही’ सक्तीमुळे बाईक टॅक्सी रायडर्स अडचणीत

‘ईव्ही’ सक्तीमुळे बाईक टॅक्सी रायडर्स अडचणीत

Published on

‘ईव्ही’ सक्तीमुळे बाइक टॅक्सी रायडर्स अडचणीत
एक वर्षाचा संक्रमण कालावधी देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : राज्य सरकारने बाइक टॅक्सी सेवेसाठी केवळ इलेक्ट्रिक दुचाकींनाच परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर हजारो बाइक टॅक्सी रायडर्स बेरोजगार झाले आहेत. कोणतीही पूर्वतयारी न करता लागू करण्यात आलेल्या या ईव्ही सक्तीमुळे रायडर्ससह दररोज बाइक टॅक्सीवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांचेही हाल होत असल्याचा आरोप बाइक टॅक्सी असोसिएशनने (बीटीए) केला आहे.

असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, आवश्यक चार्जिंग पायाभूत सुविधा, आर्थिक मदत आणि स्पष्ट नियमावली उपलब्ध नसताना  ईव्ही सक्ती करणे अव्यवहार्य आहे. बाइक टॅक्सी सेवा ही मुंबईसारख्या महानगरात स्वस्त, जलद आणि विश्वासार्ह लास्ट-माईल प्रवासासाठी महत्त्वाची ठरली आहे; मात्र अचानक लागू झालेल्या या निर्णयामुळे अनेक बाइक टॅक्सी रस्त्यावरून गायब झाल्या असून, प्रवाशांना अधिक वेळ, अधिक पैसे आणि अधिक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, महाराष्ट्राची ईव्ही पॉलिसी २०२१ ही स्वैच्छिक आणि प्रोत्साहनाधारित असून, आवश्यक चार्जिंग सुविधा व आर्थिक सहाय्यावर आधारित असल्याचे त्यात स्पष्टपणे नमूद आहे. या धोरणानुसार २०२५ पर्यंत नव्या वाहन नोंदणीपैकी १० टक्के वाहने ईव्ही असावीत, असा उद्देश ठेवण्यात आला आहे; मात्र बाइक टॅक्सी या एका क्षेत्रात १०० टक्के ईव्ही सक्ती करण्याचा हेतू या धोरणात नसल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.

सरकारच्‍या निर्णयामुळे अनेक रायडर्स घरी बसले असून, त्यांच्या बाइक्स वापरात नाहीत. बहुतेक रायडर्सच्या दुचाकींवर बँक कर्जाचे हप्ते सुरू आहेत. कामच बंद झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारकडून जाहीर केलेली ईव्ही सबसिडी, सोपी नोंदणी प्रक्रिया आणि सर्वत्र चार्जिंग स्टेशनची हमी प्रत्यक्षात अद्याप पूर्णपणे उपलब्ध नसल्याचेही रायडर्सचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, इंजिन वाहनांवरून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्यासाठी किमान एक वर्षाचा संक्रमण कालावधी देण्यात यावा, अशी मागणी बाइक टॅक्सी असोसिएशनने केली असून, त्या कालावधीत आवश्यक सुविधा आणि मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
---


मुंबईतील दैनंदिन प्रवासात बाइक टॅक्सी सेवा आज अत्यावश्यक बनली आहे. ऑटो-टॅक्सी सहज उपलब्ध नसलेल्या भागांतील प्रवाशांसाठी हा सुरक्षित, जलद आणि किफायतशीर पर्याय आहे. सरकारने ही सेवा एका रात्रीत बंद करू नये. आम्हालाही ईव्हीच्या भविष्याचा भाग व्हायचे आहे; मात्र त्या दिशेने जाण्यासाठी आम्हाला योग्य वेळ आणि संधी द्यावी.
- अमित गावडे, अध्यक्ष, बाइक टॅक्सी असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com