प्रकल्पापेक्षा ‘श्रेयवाद’ गाजतो
बदलापूर, ता. ९ (बातमीदार) : मध्य रेल्वेवरील सर्वाधिक प्रवासी वाहतुकीचा कर्जत-बदलापूर-कल्याण पट्टा दररोज गर्दीने त्रस्त असताना, अखेर बदलापूर-कर्जत तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेला केंद्र सरकारकडून २६ नोव्हेंबरला मंजुरी मिळाली. मात्र, या महत्त्वाच्या प्रकल्पापेक्षा सध्या अधिक चर्चा होत आहे ती स्थानिक आमदार किसन कथोरे आणि खासदार सुरेश म्हात्रे यांच्या श्रेयवादाची. ही मंजुरी मीच मिळवून आणली, या वक्तव्यावरून दोन्ही नेत्यांनी श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू केल्याने प्रकल्पाच्या घोषणेला राजकीय रंग चढला आहे.
कल्याण-बदलापूरदरम्यान तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचे काम आधीच सुरू आहे. त्याच वेळी बदलापूर-कर्जत मार्गिकेलाही मंत्रिमंडळ बैठकीत हिरवा कंदील मिळाला. ३२ किलोमीटर अंतरावर ६५ किलोमीटर लांबीचे नवे ट्रॅक, सहा स्थानके, आठ मोठे उड्डाणपूल, १०६ लहान पूल आणि एका भुयारी मार्गाचा समावेश असलेला हा १,३२४ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यात राज्य सरकारचा ५० टक्के निधी असणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीदरम्यान भाजपाच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंजुरीची अधिकृत घोषणा केली. मात्र, मंजुरी मिळताच आमदार किसन कथोरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हा प्रस्ताव मार्गी लागल्याचा दावा केला. त्यानंतर काही तासांतच खासदार सुरेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेतील प्रश्न, रेल्वे मंत्र्यांसोबतच्या भेटी आणि वारंवार केलेल्या पत्रव्यवहाराचा दाखला देत ही मंजुरी आपल्याच प्रयत्नांमुळे मिळाल्याचे म्हटले. या राजकीय वादामुळे ‘मंजुरी कोणाच्या प्रयत्नांमुळे?’ हा प्रश्न निर्माण झाला असला तरी प्रवासी मात्र या वादांपासून दूर आहेत.
प्रकल्प वेळेत होणे गरजेचे
कर्जत-बदलापूर-कल्याण मार्गावरील प्रचंड गर्दी, लोकलमध्ये होणारी ढकलाढकली आणि गाड्यांच्या उशिरामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे तिसरी-चौथी मार्गिका ही त्यांच्या दृष्टीने मोठा दिलासा मानली जात आहे. विकासकामाचे श्रेय कोणाला मिळणार, हे नागरिकांसाठी गौण असून, प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होऊन सुरक्षित, जलद व सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणे, हीच त्यांची प्रमुख अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

