ढवळेपाडा-गोरेगाव रस्ता सुसाट

ढवळेपाडा-गोरेगाव रस्ता सुसाट

Published on

बदलापूर, ता. ९ (बातमीदार) : बदलापूर-कर्जत राष्ट्रीय महामार्गावरील ढवळेपाडा ते गोरेगाव या दोन किलोमीटरच्या रस्त्याची तब्बल १२ वर्षांपासून दुरवस्था झाली होती. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून वाहन चालवताना होणारा त्रास, वारंवार होणारे अपघात यामुळे नागरिक आणि वाहनचालकांचे हाल होत होते. अखेर या रस्त्याच्या संपूर्ण डांबरीकरणाची कामाला सुरुवात झाली असून ‘सकाळ’ने केलेल्या सातत्यपूर्ण वृत्तांकनाला आणि मनसेचे जयेश केवणे यांनी केलेल्या आंदोलन व पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
१२ वर्षांपूर्वी बदलापूर-कर्जत महामार्ग क्रमांक ७६ चे डांबरीकरण झाल्यानंतर गोरेगाव-ढवळेपाडा पट्ट्यातील रस्त्याची कधीही मोठी दुरुस्ती झाली नव्हती. फक्त ठिकठिकाणी तात्पुरते खड्डे बुजवले जात होते. विशेषतः ढवळेपाडा ते कुडसावरे या एक किलोमीटरच्या सखल भागात पावसाळ्यात पाणी साचून रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत होती. या परिस्थितीवर ‘सकाळ’ने सातत्याने प्रकाश टाकला. वाढत्या तक्रारी, निवडणूक काळातील वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यातील मोठ्या प्रमाणातील अपघात लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारकडे प्रस्ताव पाठवला आणि अखेर कामाला मंजुरी मिळाली.
सध्या या रस्त्याचे डांबरीकरण युद्धपातळीवर सुरू असून नागरिक अपेक्षित दर्जा राखत काम पूर्ण व्हावे, अशी मागणी करत आहेत. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक तांत्रिक सूचना घेतल्या असून, रस्ता वाहतूकयोग्य व सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

वाहनचालकांमध्ये समाधान
रस्त्याच्या खड्ड्यांमुळे होणारे अपघात, रस्त्याची दुरवस्था आणि वाहनचालकांच्या समस्या या मुद्द्यांवर मनसेचे जयेश केवणे यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांनी आंदोलन करून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी वारंवार केली. पावसाळा संपल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेत उपअभियंता प्रशांत कुमार मानकर यांच्या पुढाकाराने डांबरीकरणास मंजुरी दिली आणि प्रत्यक्ष काम सुरू झाले. त्यामुळे ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. अनेक अपघातही झाले. यासाठी आम्ही प्रशासनाला पत्रव्यवहार केला, आंदोलन केले. अखेर बांधकाम विभागाने मागण्या मान्य करून डांबरीकरण मंजूर केले. हे काम पूर्ण झाल्यावर वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल.
- जयेश केवणे, विभाग अध्यक्ष, मनविसे, वांगणी

राष्ट्रीय महामार्गावरील वाढलेल्या वाहतुकीमुळे या रस्त्याची अवस्था चिंताजनक झाली होती. पावसाळ्यात दुरुस्ती शक्य नव्हती, त्यामुळे तात्पुरती डागडुजी केली. आता पावसाळा संपल्याने संपूर्ण रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात केली आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करून वाहनचालकांसाठी रस्ता सुस्थितीत केला जाईल.
- प्रशांत कुमार मानकर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

बदलापूर : ढवळेपाडा-गोरेगाव रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com