अलिबागच्या नागावमध्ये परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
अलिबागच्या नागाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
- पाच जणांवर हल्ला; वन अधिकारी, पोलिसांची फौज घटनास्थळी
- सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरूच
अलिबाग, ता. ९ (वार्ताहर) : अलिबागजवळील नागाव येथील वर्तकवाडी परिसरात मंगळवारी (ता. ९) सकाळी एका बिबट्याने पाच जणांवर हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये एका वन अधिकाऱ्याचाही समावेश आहे. बिबट्याच्या येण्याने परिसरात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागावमधील वर्तकवाडी परिसरात मंगळवारी सकाळी अमित वर्तक यांनी प्रथम त्यांच्या वाडीत बिबट्या असल्याचे पाहिले. बिबट्याने घाबरून त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हे पाहून प्रसाद सुतार त्यांच्या मदतीला गेले असता, बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला आणि वाडीत पळ काढला. ही माहिती मिळताच तातडीने अलिबाग आणि रोहा येथील वन विभागाच्या रेस्क्यू पथकांनी नागाव येथे धाव घेतली. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून परिसरात दक्षता वाढवली आहे. जखमींपैकी अमित वर्तक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर प्रसाद सुतार, मंदार गडकरी, अलिबाग वन अधिकारी एसीएफ भाऊसाहेब जवारे किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान, नागावमधील सर्व शाळेतील मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. बिबट्या वारंवार वाडीत पळून जात असल्याने त्याला पकडण्यात अडचणी येत होत्या. घटनास्थळी आरपीएफ टीमही दाखल झाली होती. स्थानिकांसह पर्यटकांच्या गाड्याही थांबविण्यात आल्या होत्या. पुणे येथील रेस्क्यू टीमने ड्रोनच्या सहाय्याने शोधल्यानंतरही बिबट्या न दिसल्याने नागरिकांमधून भीती व्यक्त होत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना मदतीसाठी गेलेल्या स्थानिक अनिकेत ढवरकर यांच्यावर बिबट्याने पुन्हा हल्ला केला. सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते, मात्र अंधार पडल्याने शोधकार्य करण्यात अडचणी येत होत्या.
चैकट:
रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र पसरले असून, या वनात जंगली प्राणीदेखील आहेत. सध्या संपूर्ण राज्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, आता बिबट्याने अलिबागमध्ये आपला मोर्चा वळविला आहे. अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण असूनदेखील येथे वन विभागाकडे अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर आवश्यक असणारी आधुनिक साधन सामग्री उपलब्ध नाही. त्यामुळे याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
प्रतिक्रिया:
बिबट्या घाबरलेला असल्याने वारंवार वाडीत पळत आहे. तो लहान असल्याने बाहेर जाण्यासाठी वाट शोधत होता. जंगलात सध्या अन्न शोधणे कठीण झाल्याने हे बिबटे मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. हा बिबट्यादेखील अन्नाच्या शोधात आला असावा.
- सागर दहिंबेकर, अध्यक्ष, सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्था
प्रतिक्रिया:
बिबट्याला पकडेपर्यंत सर्वांनी घरातच सुरक्षित राहावे आणि अनावश्यक बाहेर पडू नये. नागाव परिसरात बिबट्याचा वावर स्पष्ट झाला आहे. त्याने दोन नागरिकांवर हल्ला केला असून, वन विभागाचे पथक त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.
- हर्षदा मयेकर, सरपंच, नागाव
प्रतिक्रिया:
आमच्या घराच्या शेजारील वाडीत प्रथम बिबट्या दिसला. त्याने स्थानिकांवरही हल्ला केला. अलिबाग जिल्ह्याचे ठिकाण असूनदेखील वन्यजीव रक्षणार्थ आवश्यक सामग्री उपलब नाही, ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे पुण्यावरून रेस्क्यू टीम बोलविण्यात आली. मात्र ती येईपर्यंत तीन तासांचा वेळ गेला. अंधार होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे प्रयत्न केल्यानंतरही बिबट्या सापडलेला नाही. त्यामुळे सध्या गावात भीतीचे वातावरण आहे.
- मंदार वर्तक, स्थानिक, नागाव
प्रतिक्रिया:
सकाळी २ ते ३ वेळा बिबट्या समोर आला होता, मात्र आपल्याकडे आवश्यक साधने नसल्याने बिबट्याला पकडण्यात यश आले नाही. आता पर्यटन हंगाम सुरू आहे. बिबट्या सापडला नाही, तर याचा परिणाम पर्यटन हंगामावर होणार आहे. त्याचप्रमाणे परिसरात भीती पसरली आहे.
- रूपेश धुळप, स्थानिक व काॅटेज व्यावसायिक, नागाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

