माहीम केळवे येथील प्रस्तावित टेक्स्टाईल पार्कसाठी प्रथम पाच मेगावॅटचा विद्युत पुरवठा

माहीम केळवे येथील प्रस्तावित टेक्स्टाईल पार्कसाठी प्रथम पाच मेगावॅटचा विद्युत पुरवठा

Published on

माहीम-केळवे येथे २१० मेगावॅटचे उपकेंद्र उभारणीला मंजुरी
प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्स्टाईल हब बनणार
पालघर, ता. ९ (बातमीदार) : माहीम आणि केळवा टोकराळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्राजवळील ४०० एकर शासकीय जमिनीवर प्रस्तावित असलेल्या रिलायन्स टेक्स्टाईल पार्कला वीज वितरण कंपनीने मोठा विद्युत पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. प्रथम ५ मेगावॅट क्षमतेच्या तात्पुरत्या पुरवठ्यासाठी पालघरहून १८ किलोमीटर लांबीची केबल टाकण्याच्या १२.६४ कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.
पार्कचे काम सुरू झाल्यावर येथे २१० मेगावॅट क्षमतेचे विद्युत उपकेंद्र उभारले जाईल, ज्यामुळे पालघर-बोईसरनंतर या भागातील हे पहिले मोठे उपकेंद्र ठरेल. या उपकेंद्राचा फायदा माहीम, केळवे आणि सफाळा परिसरातील गावांना होणार असून, खुल्या तारांमुळे वारंवार होणारा वीज खंडित होण्याचा त्रास थांबेल. विशेषतः केळवे येथील पर्यटन व्यवसाय आणि सफाळा भागातील उद्योगांना यामुळे दिलासा मिळेल. हा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्स्टाईल हब बनणार असल्याने, परिसरातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
दरम्‍यान, केबलचे काम सुरू झाल्यावर दोन महिन्यांत विद्युत पुरवठा सुरू होईल, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे पालघर येथील कार्यकारी अभियंता सुनील भारंबे यांनी दिली आहे.

प्रदूषण आणि बागायतीवर भीती
रिलायन्स टेक्स्टाईल पार्क प्रकल्पाला मात्र माहीम, केळवे येथील शेतकरी, बागायतदार, मच्छिमार आणि मीठ आगर सोसायटीचा तीव्र विरोध आहे. बोईसर एमआयडीसीतील रासायनिक प्रदूषणामुळे सातपाटी ते तारापूर खाडीपर्यंतचा परिसर प्रदूषित झाला आहे. याच अनुभवामुळे, या नवीन टेक्स्टाईल पार्कमुळे निघणारे रासायनिक पाणी थेट समुद्रात सोडले जाईल आणि नारळ, केळी, पोपळीची बागायती शेती तसेच मिठागरे व खाडीतील मासेमारी पूर्णपणे नुकसानग्रस्त होईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ''टेक्स्टाईल पार्क प्रकल्प या भागात नकोच'' अशी भूमिका घेऊन येथील नागरिकांनी या प्रकल्पाला प्रखर विरोध कायम ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com