विकास कामांमुळे नरकयातना
वसई, ता. १० (बातमीदार) ः महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी शहरातील विविध विकासकामे हाती घेण्यास सुरुवात झाली आहे; मात्र अर्धवट कामामुळे वाहतूक व्यवस्थेसह सर्वसामान्यांना फटका बसू लागला आहे. प्रशासनाकडून योग्य नियोजन नसल्याने दुर्घटनेची भीती नागरिकांना सतावू लागली आहे. रस्त्यावर माती, खडीचा पसारा वाढला असून धूलिकणांमुळे प्रदूषण वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे सुविधांऐवजी नरकयातना मिळत आहेत, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वसई-विरार शहरात अमृत योजनेचे काम अनेक ठिकाणी सुरू आहे. या वेळी नवीन जलवाहिनी अंथरणे, गटाराचे रुंदीकरण, रस्ते डागडुजी अशी कामे केली जात आहेत. या कामांसाठी खोदकाम केले जात आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे शाळा, रहदारीच्या ठिकाणी नागरिकांसह विद्यार्थ्यांना ये-जा करताना चालणेदेखील कठीण झाले आहे. धूलिकण हवेत मिसळत आहेत, त्यामुळे वाहन चालवताना खबरदारी घ्यावी लागत आहे, तर दुसरीकडे घरातदेखील धूळ पसरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रदूषणासह आरोग्यविषयक समस्यांना आमंत्रण दिले जात आहे.
एकीकडे कोट्यवधींची विकासकामे केली जात आहेत. त्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे; परंतु शहर व ग्रामीण भागात विकासकामे करताना समस्यांचे डोंगर अधिक होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात अवस्था बिकट झाली होती. नागरिकांचे चांगलेच हाल झाले. महापालिकेने कामांकडे पाठ फिरवली. खड्ड्यांचे जाळे ठिकठिकाणी पसरले होते; परंतु लक्ष दिले नाही. आता विकासकामांमुळे पुन्हा प्रवास खडतर झाला आहे, असे मत नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
चालकांची तारांबळ
नालासोपारा महामार्गानजीक असलेल्या पेल्हार, विरार अशा विविध भागांत विकासात्मक कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. विकासाची कामे करताना योग्य ते नियोजन प्रशासन करत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागतो, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
नियोजनाचा अभाव
एकीकडे सणासुदीत रस्त्याची दुरवस्था झाली. त्यावरून राजकीय वातावरण तापले होते. आंदोलनदेखील करण्यात आले, तर नागरिकांतून संताप व्यक्त केला गेला. त्यानंतर पालिकेने निविदा काढून कामे हाती घेतली, तर आता विकासकामे करताना नियोजनाचा अभाव दिसून येऊ लागला आहे.
सुरक्षेचा प्रश्न
जलवाहिनी अंथरताना रस्त्यावर खोदकाम करून त्यावर खडी टाकण्यात आली आहे. ज्या भागात गटारांची कामे सुरू आहेत, तिथे सळ्या बाहेर आहेत. सांडपाणी जाण्याचा मार्ग उघडा आहे. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास यामुळे असुरक्षित झाला आहे.
वसई-विरार शहरात विविध विकासकामे केली जात आहेत. नागरिकांना रहदारीचा त्रास होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येईल. संबंधित भागात पाहणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- प्रदीप पाचंगे, शहर अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

