कासा परिसरातील शेतकऱ्यांचा विविध भाजीपाला लागवडीकडे वाढता कल

कासा परिसरातील शेतकऱ्यांचा विविध भाजीपाला लागवडीकडे वाढता कल

Published on

शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवडीकडे वाढता कल
कासामध्ये भातशेतीसोबत दुहेरी लागवडीमुळे उत्पन्नात मोठी वाढ
कासा, ता. १० (बातमीदार) : पूर्वी केवळ भातशेतीवर अवलंबून असणारे कासा आणि परिसरातील शेतकरी आता आधुनिकतेची कास धरत विविध भाजीपाला आणि फुलशेतीकडे वळले आहेत. या महत्त्वपूर्ण बदलामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून, त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत मिळाली आहे.
भातशेतीसोबत भाजीपाला लागवड करून दुहेरी उत्पन्न मिळवण्याचा कल गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मिरची, टोमॅटो, वांगी, गवार, फ्लॉवर, दुधी, गिलके, भेंडी, काकडी यांसारख्या भाजीपाला पिकांसोबतच अनेक शेतकरी फुलशेतीकडेही वळले आहेत.
भाजीपाला पिकांचे वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ दीड ते दोन महिन्यांत उत्पादन देऊ लागतात. त्यामुळे अल्पावधीतच आर्थिक परतावा मिळत असल्याने शेतकऱ्यांची पसंती भाजीपाला लागवडीला मिळत आहे. भातशेतीसह भाजीपाला उत्पादन करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना सध्या रोजचे हजार ते दीड हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळत असल्याचे सांगण्यात आले.
पिकांवर होणारे रोग व कीड नियंत्रणासाठी लागणारी खते व औषधेही स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असल्याने उत्पादन खर्चही नियंत्रणात ठेवणे शक्य झाले आहे. येत्या काळात कासा तालुक्यातील शेती अधिक वैविध्यपूर्ण आणि समृद्ध होण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकऱ्यांनी स्वीकारलेल्या या नव्या बदलामुळे परिसरातील कृषी क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
------------------------
रोपांची सहज उपलब्धता
शेतकऱ्यांचा वाढता कल पाहता, नाशिक आणि मालेगाव येथील नर्सरीमधून आणलेली विविध भाजीपाला रोपे आता कासा येथील कृषी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध आहेत. १०० रोपांच्या कॅरेटची किंमत साधारणपणे ₹१०० ते ₹३०० इतकी आहे. रोपांच्या सहज उपलब्धतेमुळे परिसरातील शेतकरीही आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. विशेष म्हणजे, कमी पाण्याच्या जमिनीवरही भाजीपाला लागवड करून शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत.
------------------------
नवे प्रयोग
“पूर्वी आम्ही फक्त भातशेतीवर अवलंबून होतो, परंतु आता भाजीपाला लागवडीमुळे अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे आधुनिक तंत्रज्ञान समजून घेऊन आम्ही शेतीत नवे प्रयोग करत आहोत.” असे वेती येथील शेतकरी कैलास बसवत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com