कासा–सायवन–उधवा–संजाण रस्त्याच्या कामामुळे नागरिकांचे हाल

कासा–सायवन–उधवा–संजाण रस्त्याच्या कामामुळे नागरिकांचे हाल

Published on

कासा रस्त्याची दुरवस्था
परिसरात धुळीचे साम्राज्य; कंत्राटदाराच्या दुर्लक्षाचा स्थानिकांचा आरोप
कासा, ता. १० (बातमीदार) : डहाणू आणि तलासरी तालुक्याला गुजरात सीमा आणि राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या कासा-सायवन-उधवा-संजाण या ५३ किमी लांबीच्या महत्त्वाच्या रस्त्याच्या नूतनीकरणामुळे नागरिक आणि वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. तब्बल २६८ कोटी रुपयांच्या निधीतून हे काम सुरू झाले असले तरी, कंत्राटदाराच्या निष्काळजीमुळे सुरुवातीलाच नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धरमपूर-सायवन-निंबापूर परिसरात रस्ता रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात माती खोदून ठेवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रस्ता केवळ एकेरी ठेवण्यात आल्यामुळे वाहनांची कोंडी नित्याची झाली आहे. खोदकाम आणि मातीच्या ढिगाऱ्यामुळे परिसरात धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त होण्याच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अर्धवट काम, खोदकामाच्या कडा, सूचना फलक तसेच सुरक्षिततेचे बॅरिकेड्स नसणे, यामुळे रात्रीच्या वेळी धोका अधिक वाढला आहे. स्थानिकांच्या मते, सध्या कामाची पद्धत अत्यंत धोकादायक आहे. कंत्राटदाराने त्वरित सूचनाफलक, वाहतूक नियंत्रणासाठी स्वयंसेवक, तसेच धुळीवर नियंत्रण करण्यासाठी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी, अन्यथा अपघातांची मालिका अधिक गंभीर रूप धारण करू शकते.
यासंदर्भात कंत्राटदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
------------------------
२६८ कोटींचा प्रकल्प
वाढवण बंदर प्रकल्पाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने याचे बळकटीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अंतर्गत हे काम ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाले असून, ३० महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी तब्बल २६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. रस्त्याची रुंदी पाच मीटरवरून सात मीटर आणि सात मीटरवरून १० मीटरपर्यंत वाढवली जाणार आहे. पुलांचे नूतनीकरणही या कामात समाविष्ट आहे, अशी माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली.
------------------------
कासा-सायवन-उधवा मार्गावर रस्ता दोन्ही बाजूंनी खोदला असून, फक्त एकेरी रस्ता ठेवला आहे. मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. आमच्या चिकूच्या झाडांवर आणि शेतातील भाजीपाल्यावर उडणाऱ्या धुळीमुळे मोठे नुकसान होत आहे. कंत्राटदाराने तातडीने उपाययोजना कराव्यात.
- अतुल जाधव, अध्यक्ष, भारतीय अस्मिता पार्टी, डहाणू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com