‘शताब्दी’च्या खाजगीकरणाला विरोध सुरूच!
‘शताब्दी’च्या खासगीकरणाला विरोध सुरूच!
महिला मंडळ फेडरेशनच्या स्वाक्षरी मोहिमेला प्रतिसाद
मुंबई, ता. १० ः गोवंडीतील पालिकेच्या शताब्दी रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा निर्णय तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी कंबर कसली आहे. खासगीकरण केल्यामुळे या रुग्णालयावर अवलंबून असलेल्या किमान ८ ते १० लाख लोकांच्या उपचाराचे काय, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येतोय. यासाठी महिला मंडळ फेडरेशनच्या वतीने स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पालिका प्रशासनानाला देण्यात येणार आहे. खासगीकरण रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा फेडरेशने दिला आहे. गोवंडी येथील पालिकेचे पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय उपनगरातील मुंबईकरांना रुग्णसेवा पुरवणारे पालिकेचे महत्त्वाचे रुग्णालय आहे. चेंबूर, गोवंडी, कुर्ला, ट्रॉम्बे, टिळकनगर, माहुल, पोस्टल कॉलनी, नेहरूनगर, घाटला, खारदेवनगर, शिवाजीनगर, देवनार, वाशीनाका अन्य परिसरातील हजारो रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येतात. या रुग्णालयात एनआयसीयू आणि आयसीयू सुविधा, औषधे व कर्मचारी तुटवडा भासत असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागतोय, मात्र या कमतरता दूर करण्याऐवजी पालिका प्रशासनाने शताब्दी रुग्णालयाचे खासगीकरण करण्यात येणार असल्याने याला विरोध असल्याचे नागरिकांनी सांगितले. खासगीकरण करून पालिका, राज्य सरकार या विभागातील सामान्य जनतेचे हक्क हिरावून घेत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
काय आहे मागण्या?
खासगीकरण थांबवा, कर्मचारी भरती करा, सोयीसुविधा उपलब्ध करून द्या
पालिका एम पूर्व विभागात ८ ते १० लाख लोकसंख्या आहे. या लोकसंख्येच्या मानाने आरोग्य सुविधा अपुरी पडत आहे. पालिका व राज्य सरकार गरीब व गरजू रुग्णाचे शोषण करत आहे.
- रत्ना माने,
कार्यकर्त्या, महिला मंडळ फेडरेशन
दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. वैद्यकीय खर्च परवडत नाही. रुग्णालयाचे खासगीकरण थांबले पाहिजे अन्यथा रुग्णांना उपचार घेता येणार नाही.
- अंजू जाधव, ज्येष्ठ नागरिक
शताब्दी रुग्णालयाचे खासगीकरण १०० टक्के करण्यात येणार नाही. रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी खासदार अनिल देसाई आणि मी पालिका आयुक्तांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली आहे.
- अनील पाटणकर, माजी नगरसेवक, शिवसेना (ठाकरे गट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

