वाढती इनकमिंग भाजपची चिंता वाढवणारी

वाढती इनकमिंग भाजपची चिंता वाढवणारी

Published on

वाढती इनकमिंग भाजपची चिंता वाढवणारी
निष्ठावानांना उमेदवारीची चिंता
संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. १० : वसई तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर झाल्यामुळे सध्या भाजपला ‘अच्छे दिन’ आले असून, एकेकाळी मजबूत असणाऱ्या बहुजन विकास आघाडीला (बविआ) मात्र मोठी गळती लागली आहे. बविआतील अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी टप्प्याटप्प्याने भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने बविआला मोठा धक्का बसत आहे, मात्र या वाढत्या ‘इनकमिंग’मुळे भाजपमधील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी मिळण्याबाबत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
भाजपमध्ये बविआचे आठ माजी नगरसेवक आणि माजी सभापतींनी प्रवेश केला आहे, तर आणखी काही मोठे पदाधिकारी भाजपच्या गळाला लागले असल्याचा दावा भाजप पदाधिकारी करत आहेत. वसई-विरार महापालिकेची सत्ता कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेण्याचा भाजपचा निर्धार आहे. त्यासाठी आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे आणि आमदार विलास तरे हे आपापल्या मतदारसंघातील बविआच्या माजी नगरसेवकांना पक्षात आणण्यात यशस्वी होत आहेत. याशिवाय, पूर्वपट्टीत विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेची ताकद भाजपच्या पाठीशी असल्याने महापालिका निवडणुकीत पंडित समर्थकांचाही विचार भाजपला करावा लागणार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत बविआ आणि इतर पक्षांतून येत असलेल्या आयारामांना उमेदवारी देताना, भाजपच्या निष्ठावान इच्छुकांना सामावून घेण्याचे मोठे आव्हान भाजप नेतृत्वापुढे असणार आहे. तिन्ही आमदार आपापल्या मतदारसंघातील प्रभागात आपल्या मर्जीतील उमेदवारांना तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करतील, त्यामुळे तिघांनाही आपापसात ताळमेळ ठेवूनच निर्णय घ्यावे लागणार आहेत. वसई-विरारमध्ये पहिल्यांदाच सत्ता मिळण्याची संधी असल्याने इच्छुकांची गर्दी वाढली आहे, त्यात उत्तर भारतीय इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. आयारामांची वाढती संख्या आणि इच्छुकांना सामावून घेण्याची कसरत यात भाजप अपयशी ठरल्यास, अंतर्गत कलह होऊन त्याचा थेट फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता अधिक आहे.

‘आयारामांमुळे’ घालमेल
‘‘गेल्या कित्येक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करून आता सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना, बाहेरून येणाऱ्यांसाठी पायघड्या टाकल्या जात आहेत. मग आम्ही फक्त सतरंज्याच उचलायच्या का,’’ असा प्रश्न भाजपचे स्थानिक कार्यकर्ते विचारू लागले आहेत. पक्षप्रवेश करणारे नेते कोणतीही ‘अपेक्षा न ठेवता’ पक्षात येत असल्याचे सांगत असले तरी, माजी नगरसेवकांना उमेदवारीची अपेक्षा असल्यानेच ते पक्षप्रवेश करत आहेत, हे उघड सत्य आहे. त्यामुळे उमेदवारी नक्की मिळेल, या आशेने काम करणाऱ्या भाजपमधील जुन्या इच्छुकांमध्ये सध्या मोठी घालमेल सुरू आहे.

विचाराची गरज
बविआचे काही नगरसेवक भाजपमध्ये जात असले तरी, त्यांचे स्थानिक कार्यकर्ते मात्र आजही माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यामागे भक्कमपणे उभे आहेत. त्यामुळे बविआच्या नगरसेवकांना घेऊन भाजपला खरोखर फायदा होईल का, याचाही विचार भाजपला करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com