एसटीच्या कर्तव्यदक्ष महिला वाहकाचा आदर्श
एसटीच्या कर्तव्यदक्ष महिला वाहकाचा आदर्श
निनावी धनादेश व पैशाने भरलेली बॅग प्रवाशाला गाठून केली परत
कल्याण, ता. १० (बातमीदार) : विठ्ठलवाडी एसटी आगारात कार्यरत महिला वाहक भारती घाडगे यांनी आपल्या प्रामाणिकतेचा उत्कृष्ट नमुना नुकताच दाखवून दिला आहे. प्रवासादरम्यान एका वयोवृद्ध प्रवाशाची पैशांनी भरलेली बॅग आणि सही केलेला निनावी धनादेश वाहनात विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी तो सुरक्षितपणे मालकाकडे परत करून समाजसेवेचे निस्वार्थी मूल्य जपले. याबाबत एसटी आगारात सहकाऱ्यांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
विठ्ठलवाडी-तारकपूर प्रवासादरम्यान भारती घाडगे यांची एसटी बस घाटामध्ये बंद पडली. यादरम्यान बसमधील प्रवासी दुसऱ्या एसटीतून पुढील प्रवासासाठी रवाना झाले. याचदरम्यान, वाहन तपासणी करताना वाहक भारती घाडगे यांना एका प्रवाशाची मोठ्या रकमेची बॅग बसमध्येच राहिलेली आढळून आली. त्यांनी वेळ न दवडता तत्काळ पुढे जाणाऱ्या तुळजापूर-मुरबाड गाडीतील चालक भालेराव यांना माहिती दिली व स्वतः आळेफाटा एसटीस्थानकात पोहोचून या प्रवाशाला बॅग सुपूर्द केली. या बॅगेत रोख रक्कम व सही केलेला निनावी धनादेश असल्याचे वयोवृद्ध प्रवाशाने सांगत घाडगे यांचे आभार व्यक्त केले.
आगाराकडून सन्मान
विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या वाहक भारती जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या तातडीच्या निर्णयाने आणि प्रामाणिक कृतीने प्रवासी आणि जनमानसावर प्रभाव पाडला आहे. एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या अशा कर्मचाऱ्यांमुळे एसटीवरील विश्वासार्हता वाढते. स्थानिक नागरिक, सहकारी कर्मचारी आणि प्रवासीवर्गाकडून भारती घाडगे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या कर्तव्यदक्ष आणि निष्ठावान सेवाभावाबाबत नवनियुक्त आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, स्थानक प्रमुख अविनाश गोसावी व योगेंद्र कदम यांच्या उपस्थितीत आगारात आल्यानंतर त्यांना सन्मानित करण्यात आले. एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास हे घोषवाक्य अशा कर्मचाऱ्यांमुळे सार्थकी ठरते, अशा भावना या वेळी कदम यांनी व्यक्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

