‘अंबरनाथ-बदलापूर’चा फॉर्म्युला कल्याण डोंबिवलीत

‘अंबरनाथ-बदलापूर’चा फॉर्म्युला कल्याण डोंबिवलीत

Published on

कल्याण-डोंबिवलीत बॅनरबाजीचा कहर
‘अंबरनाथ-बदलापूर’चे सूत्र राबविण्याची शक्यता; इच्छुकांमध्ये धाकधूक
शर्मिला वाळुंज ः सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० ः कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष फुटाफुटीचे राजकारण काहीसे आता शमले आहे. महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळू नये म्हणून अंबरनाथ-बदलापूर नगरपालिकेतील शेवटच्या दिवशीच एबी फॉर्म हा फॉर्म्युला आता कल्याण-डोंबिवलीसह ठाण्यातदेखील राबविला जाण्याची दाट शक्यता आहे. पक्षाकडून उमेदवारी जाहीर होत नसल्याने इच्छुकांनी आपला पॅनेल तयार करत उमेदवारांची बॅनरबाजीतून जाहिरात सुरू केली असल्याचे दिसते. यावर प्रशासनचा कोणताही अंकुश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात महायुती होण्याची शक्यता असली तरी अंबरनाथ-बदलापूरमधील अनुभव गाठीशी घेऊन पक्षातील पदाधिकारी काम करताना दिसत आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ऑपरेशन लोटस राबवून शिंदे सेनेची ताकद कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुरू केला. शतप्रतिशत भाजप असा नारा देत त्यांनी कल्याण-डोंबिवलीमधील शिंदे गट, ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी पक्षातील अनेक मोठे मासे आपल्या गळाला आधीच लावून घेतले. शिंदे गटाकडे आता काही मोजकेच शिलेदार उरले आहेत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही, अशी परिस्थिती कल्याण-डोंबिवलीत आहे.
महायुतीची चर्चा आता जोर धरत असताना आपल्याला पॅनेलमधून उमेदवारी मिळेल की नाही यावरून कार्यकर्त्यांमध्ये काहीशी चलबिचल सुरू झाली आहे, तर काही इच्छुकांनी आपली उमेदवारी फिक्स असल्याचे प्रभागात बॅनरबाजीच्या माध्यमातून प्रभाव पाडण्यास सुरुवात केली आहे. इच्छुकांनी स्वतःच पॅनेल तयार करत बॅनरबाजीचा धडाकाच शहरात लावला आहे. पक्षातील उमेदवारांत फाटाफूट होऊ नये म्हणून अंबरनाथ-बदलापुरात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते. हाच कित्ता कल्याण-डोंबिवली, ठाण्यात राबविला जाऊ शकतो. यामुळे इच्छुकांनी निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच आपली जाहिरात करण्यास सुरुवात केली आहे.

जुन्या लोकप्रतिनिधींना पुन्हा प्राधान्य?
पॅनेलराजमुळे अंबरनाथ-बदलापूरमधील चित्र पाहता कल्याण-डोंबिवलीतही जुन्या लोकप्रतिनिधींना पुन्हा प्राधान्य मिळू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच डोंबिवली पश्चिमेतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी विकास म्हात्रे व बाळा म्हात्रे हे या ठिकाणचे शिंदे गटाचे उमेदवार असतील, असे त्यांनी अप्रत्यक्षपरीत्या जाहीर केले आहे, तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीदेखील दीपेश म्हात्रे, प्रकाश भोईर, महेश पाटील, डॉ. सुनिता पाटील यांसारख्या दिग्गजांना पक्षात प्रवेश देत हे भाजपचे चेहरे असतील, असा स्पष्ट संदेश दिला आहे.

शहराचे विद्रुपीकरण
या बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात होत आहेत. एकीकडे पालिका प्रशासन शहरातील अनधिकृत बॅनरबाजीवर कारवाई करत असल्याचा दावा करत आहे, मात्र डोंबिवली पूर्व, पश्चिम, कल्याण ग्रामीण परिसरात महायुतीमधील इच्छुकांनी लावलेल्या बॅनरवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. गेल्या महिनाभरापासून हे फलक शहरात लागण्यास सुरुवात झाली असून, हे बॅनर पालिकेच्या नजरेस पडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com