श्र्वानदंशाचा वाढता आलेख

श्र्वानदंशाचा वाढता आलेख

Published on

पंढरीनाथ कुंभार : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. १० : भिवंडी महापालिकेने नेमलेल्या ठेकेदाराकडून शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. निर्बिजीकरण आणि रेबीज लसीकरणात होणाऱ्या विलंबामुळे श्र्वानदंशाचे प्रमाण सतत वाढत आहे. सद्यस्थितीनुसार जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत फक्त ११ महिन्यांत कुत्र्यांनी १० हजार १४० जणांवर हल्ला करून चावा घेतला आहे. तर शहरातील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत दरमहा शेकडो नागरिकांनी उपचार घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ मध्ये सर्वाधिक १,०६६ रुग्णांची नोंद इंदिरा गांधी रुग्णालयात झाली आहे. सप्टेंबरमध्ये सर्वांत कमी रुग्ण उपचारासाठी गेले आहेत. सप्टेंबरमधील सर्वांत कमी घटनांची संख्या ६६१ होती; पण २८ नोव्हेंबरला एकाच दिवसात ७२ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. त्यापैकी ३२ जणांना सकाळी ८ ते दुपारी २ दरम्यान आणि ४६ जणांना दुपारी २ ते संध्याकाळी ५.१५ दरम्यान चावा घेण्यात आला. यापैकी २० रुग्ण केवळ शांतीनगर परिसरातील होती. त्यामध्ये बहुतेक लहान मुलांचा समावेश होता.
भिवंडी महापालिकेने पाच वर्षांसाठी हैदराबादमधील सफिलगुडा येथील पशुवैद्यकीय कल्याण आणि ग्रामीण विकास संस्थेला कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि रेबीज लसीकरणाचा ठेका दिला आहे. त्यांच्याकडे शहरातील १३ हजार ५०० भटक्या कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण करण्याचे उद्दिष्ट होते; परंतु १०० श्वानांचेच निर्जंतुकीकरण करण्यात आले. ११ नोव्हेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत केवळ पाच हजार ३३६ श्र्वान म्हणजेच केवळ ३९.५२ टक्के निर्बिजीकरण करण्यात आले. यामध्ये दोन हजार ८३३ नर आणि दोन हजार ५०३ मादींचा समावेश आहे. महापालिकेतील विश्वसनीय सूत्रांनुसार,
कर्मचाऱ्यांच्या तीव्र कमतरतेमुळे निर्बिजीकरण प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. भिवंडी महापालिका मुख्यालयाच्या आवारात आणि इतर सरकारी कार्यालयांच्या आवारातही भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. कधी कधी शहरातील रस्त्यावर कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसतात. श्र्वानदंशाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ आणि मंदगतीने सुरू असलेल्या निर्बिजीकरण मोहिमेमुळे भिवंडीतील नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे नागरिक आणि सामाजिक संघटनांनी निर्बिजीकरण आणि लसीकरणाच्या मोहिमेला गती देण्याची मागणी केली आहे.
याप्रकरणी महापालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी फैजल तातली कार्यालयात भेटले नाहीत. फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

रेबीज इंजेक्शनचा तात्पुरता तुटवडा
रुग्णालयात रेबीज इंजेक्शन उपलब्ध आहेत; परंतु काही वेळा एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात रुग्ण आल्यास तात्पुरता तुटवडा निर्माण होतो. २८ नोव्हेंबरला ७२ घटनांमुळे काही काळासाठी इंजेक्शन कमी पडले; पण तातडीने पुरवठा मागवून सर्व रुग्णांवर उपचार करण्यात आले, असे आयजीएम उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधवी पांढरे म्हणाल्या,

---------
भिवंडी महापालिकेच्या ठेकेदाराकडून शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी काम सुरू आहे. त्यासाठी महापालिकेने इदगा रोड येथे पालिकेच्या कत्तलखान्याच्या जागेत स्वतंत्र व्यवस्था केली आहे. खासगी कंत्राटदाराकडून आतापर्यंत केवळ ४० टक्के निर्बिजीकरण पूर्ण झाले आहे.
- जयवंत सोनावणे, आरोग्य अधिकारी,
भिवंडी महापालिका
---------

रुग्णांची आकडेवारी
जानेवारी - १,०६६
फेब्रुवारी - १,०४२
मार्च - १,१०४
एप्रिल - ९८८
मे - १,०००
जून - ६८९
जुलै - ९५७
ऑगस्ट - ८२१
सप्टेंबर - ६६१
ऑक्टोबर - ८९७
नोव्हेंबर - ८९७
एकूण ११ महिने - १०,१४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com