पारशीवाडी येथील पालिका शौचालयात घाणीचे साम्राज्य
पारशीवाडीतील पालिका शौचालय दुर्लक्षित
पाणी, वीज, साफसफाईच्या अभावामुळे नागरिकांची कुचंबणा
घाटकोपर, ता. १० (बातमीदार) : घाटकोपर पश्चिम पारशीवाडी येथील गणेश मैदान म्युनिसिपल शाळेजवळ महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत उभारलेले वस्ती शौचालय सध्या पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहे. शौचालयात घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. पाणी, वीज आणि साफसफाईचा अभाव असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या शौचालयात नियमित आणि पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी लाइट नसल्यामुळे नागरिकांची कुचंबणा होते. नियुक्त केलेले सफाई कर्मचारी सतत गैरहजर राहात असल्याने शौचालयाच्या आत आणि परिसरात घाण साचलेली असते. त्यामुळे दुर्गंधी इतकी तीव्र असते की नागरिकांना नाक दाबूनच शौचालयात प्रवेश करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, मागील तीन वर्षांपासून या शौचालयातील मुतारी बंद असून, तिला टाळा लावण्यात आला आहे. त्यामुळे लघुशंकेसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शौचालयाची रचना आणि स्थिती चांगली असतानाही पाणी, स्वच्छता आणि देखभालीअभावी ते वापरायोग्य राहिलेले नाही.
स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही स्थिती बदललेली नाही. त्यामुळे कायमस्वरूपी साफसफाई कर्मचारी तत्काळ नेमणे, पाणीपुरवठा सुरळीत करणे, तसेच लाइटची सुविधा उपलब्ध करून देणे, अशी ठोस मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने त्या शौचालयाची स्वच्छता करून घेण्यात येईल.
- साजिद सौदागर, सहाय्यक अभियंता, घनकचरा व्यवस्थापन, एन विभाग
गणेश मैदान रस्त्यावर मनपाकडून नव्याने बांधलेले शौचालय माजी नगरसेवक यांच्या निकटवर्तीय संस्थेस देखभालीसाठी देण्यात आले, परंतु त्यांच्याकडून त्या शौचालयाची देखभाल व्यवस्थितपणे करण्यात आली नाही. मागील तीन महिन्यांपासून त्या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी कर्मचारीदेखील नाहीत. लवकरात लवकर मनपाकडून यावर कार्यवाही केली नाही, तर सहाय्यक आयुक्त एन विभाग यांच्या दालनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात येईल.
- अरविंद गीते, शाखाध्यक्ष, मनसे
संबंधित संस्थेशी माझा काहीच संबंध नाही. अगोदर असलेल्या संस्थेने बरेच बिल थकीत ठेवले होते. लोकांना सुविधा मिळावी यासाठी आम्ही पैसे भरून शौचालय नागरिकांच्या सेवेसाठी सुरू केले. सध्या त्याची वेळेत स्वच्छता केली जाते, लाइटदेखील आहे.
- सूर्यकांत गवळी, माजी नगरसेवक

