प्लास्टिक पिशवी वेंडिंग मशीन बंद

प्लास्टिक पिशवी वेंडिंग मशीन बंद

Published on

कापडी पिशवी वेंडिंग मशीन बंद
नागरिकांचा प्रतिसादही कमी
कामोठे, ता. १० (बातमीदार) : प्लॅस्टिक वापर कमी करण्याच्या उद्देशाने पनवेल महानगरपालिकेने शहरातील विविध ठिकाणी बसवलेल्या कापडी पिशवी वेंडिंग मशीनपैकी कामोठे आणि पनवेलमधील मशीन तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आहेत. यामुळे नागरिकांना या उपयुक्त सुविधेचा लाभ घेता येत नाही. त्यातच या योजनेला नागरिकांकडून अपेक्षेइतका प्रतिसाद मिळत नसल्याने मशीन प्रत्यक्षात निष्प्रभ ठरत आहेत.
महानगरपालिकेने यावर्षी जुलै महिन्यात खारघरमध्ये पाच, कामोठ्यात दोन, नवीन पनवेलमध्ये एक, कळंबोलीत एक आणि पनवेलमध्ये एक, अशा एकूण १० वेंडिंग मशीन बसवल्या. प्रत्येक मशीनची क्षमता ३०० कापडी पिशव्यांची असून, योजनेच्या प्रारंभी सुमारे तीन हजार पिशव्या या मशीनमध्ये ठेवण्यात आल्या. १० रुपयांचे कॉइन टाकल्यावर पिशवी उपलब्ध होण्याची सुविधा देण्यात आली आहे.
वेंडिंग मशीनचे संचालन महिला बचत गटांकडे देण्याचा पालिकेचा विचार होता, मात्र बचत गटांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही योजना प्रत्यक्षात अडकून पडली आहे. कामोठेतील विस्टा कॉर्नर परिसरातील आणि पनवेल प्रभाग समिती ‘ड’ कार्यालयासमोरील दोन्ही मशीन सध्या बंद आहेत.
काही ठिकाणी नागरिकांनी मशीनमध्ये नाणी न टाकता प्लॅस्टिकचे व्हायझर अथवा इतर वस्तू टाकल्याने मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. बिघाड दूर करून मशीन लवकरच पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
प्लॅस्टिकचा वापर थांबवून पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा स्वीकार व्हावा, या उद्देशाने पालिकेतर्फे सातत्याने जनजागृती केली जात आहे. कापडी पिशवी वेंडिंग मशीनचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहनही महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com