गोदामांच्या आड गुटखा रॅकेट
भिवंडी, ता. १० (वार्ताहर) ः शहर परिसरात सर्रासपणे गुटखाविक्री सुरू असून कोणत्याही पानपट्टीवर विक्रीसाठी गुटखा टांगलेला आढळून येतो. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागात वितरित करण्यासाठी कंटेनरच्या माध्यमातून गुजरातमार्गे आणला जाणारा गुटखा भिवंडी परिसरातील गोदाम भागात छोट्या टेम्पोमध्ये भरून वाहतूक केली जाते. भिवंडी पोलिस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात २०२५ मध्ये गुटखा तस्करी करणाऱ्यांविरोधात ११ गुन्हे दाखल करून १६ जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यांमध्ये एकूण एक कोटी ३० लाख ७४ हजारांचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.
भिवंडी येथील गोदामात देशभरातून ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून मोठ्या मालाची ने-आण केली जाते. यामध्ये सुरत येथून मोठ्या प्रमाणावर कपडा गोदामात येतो. याचा फायदा घेत गुटखा तस्कर बाहेरून खोके व गोण्यांवर वेगळ्या मालाची नोंद, तर आतमध्ये गुटखा भरून गोदामात आणला जातो. त्यामुळे बऱ्याच वेळा वाहतूकदारांनासुद्धा गुटखा असल्याची माहिती नसते. त्यामुळे अनेक वेळा ते गुटखा तस्करांच्या फसवणुकीला बळी पडतात. याचा फायदा घेत अनेक गुटखा तस्कर वाहतूकदारांच्या ट्रकमधून गुटख्याच्या आठ ते दहा गोण्या पाठवल्या जातात. त्यामुळे भिवंडी गुटखा तस्करीचे केंद्र बनले असल्याचा आरोप आमदार रईस शेख यांनी विधानसभेत केला होता.
अन्न व औषध प्रशासनाचा कर्मचारी तुडवडा
भिवंडी पोलिस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात सहा पोलिस ठाणे असून ठाणे ग्रामीण पोलिस उपअधीक्षक कार्यक्षेत्रात ग्रामीण भागात तीन पोलिस ठाणे आहेत. एकूण तालुक्यातील क्षेत्रफळ व विस्तार पाहता या भागात अवघे दोन अन्न निरीक्षक नेमणूक केले जातात. त्यांच्याकडे या गुटख्यावर कारवाईची जबाबदारी असते; पण कर्मचाऱ्यांचा तुटवडा, तर बऱ्याच वेळा पोलिसांकडून केलेल्या कारवाईनंतर तक्रार दाखल करण्यास अन्न निरीक्षक वेळेत उपलब्ध होत नसल्याने कारवाया थंडावतात.

