विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभिमुख संस्कारांची गरज अधोरेखित
विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभिमुख संस्कारांची गरज अधोरेखित
रेश्मा राठोड यांचे प्रतिपादन ः वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
ठाणे, ता. १० (बातमीदार) : मोबाईलपासून दूर राहून मातीशी खेळण्याचा आनंद अनुभवा, कारण त्यामुळे शारीरिक आणि मानसिक विकास घडतो, असे स्पष्ट मत खो-खो विश्वकप विजेती रेश्मा राठोड यांनी व्यक्त केले. जिद्द, प्रामाणिकपणा, मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर यश नक्की मिळते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
वर्तकनगर येथील श्रीमती सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिरामध्ये वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (ता. ८) मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राठोड यांच्यासह माजी महापौर मीनाक्षी शिंदे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्तकनगर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र आयरे होते. स्पर्धांचे उद्घाटनही आयरे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहवर्धक स्पर्धा पाहायला मिळाली. कार्यक्रमास संस्थेचे मुख्य चिटणीस संजय राव, संयुक्त चिटणीस संजय राऊत, ज्येष्ठ सदस्य नरहरी समर्थ, गिरीश पाटील, शाळेचे मुख्याध्यापक पदमसिंग परदेशी आणि सर्व शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद वांगड यांनी तर क्रीडा अहवाल वाचन क्रीडा प्रमुख पंकज चौगुले यांनी केले.
अभ्यासाइतकाच खेळालाही महत्त्व
माजी महापौर शिंदे म्हणाल्या, अभ्यासाइतकाच खेळालाही महत्त्व आहे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते, स्मरणशक्ती वाढते, वर्तनात सकारात्मकता येते आणि व्यक्तिमत्त्व घडते. हे सर्व गुण भविष्य घडवितात, तर राजेंद्र आयरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता हे गुण खेळातून विकसित होतात असे नमूद केले. खेळामुळे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडतो आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

