माणगावच्या अन्विता बुटे हिची जागतिक कर्तबगारी
माणगावच्या अन्विता बुटे हिची जागतिक कर्तबगारी
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद
माणगाव, ता. १० (वार्ताहर) ः माणगावच्या १४ वर्षीय रोलर स्केटिंगपटू अन्विता संजना संजय बुटे हिने तिच्या कर्तृत्वाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा गौरव वाढवला आहे. अतुलनीय वेग, संतुलन आणि अचूक तंत्र यांच्या जोरावर साधलेला हा पराक्रम आज जागतिक पातळीवर भारताचा ठसा उमटवणारा ठरला आहे. कर्नाटकातील शिवगंगा रोलर स्केटिंग स्पर्धेत २४ ऑक्टोबर २०२५ रोजी अन्विताने अतिशय धडाकेबाज प्रदर्शन करत १०० मीटर अंतर २२.२२ सेकंदांमध्ये पूर्ण केले. या असामान्य कामगिरीची अधिकृत दखल घेऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने तिचे नाव नोंदवले, ही माणगाव शहरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
विद्यानगर, माणगावची रहिवासी व एस. व्ही. पी. विद्यालयात इयत्ता नववीत शिकणाऱ्या अन्विताला लहानपणापासूनच स्केटिंगचे आकर्षण होते. तिच्यातील क्षमता ओळखून आई-वडील संजय व संजना बुटे यांनी आर्थिक अडचणींचा सामना करत तिच्या प्रत्येक पावलाला भक्कम आधार दिला. कठोर मेहनत आणि तळमळ यांच्या जोरावर ७८ मिनिटे अखंड स्केटिंगचा आणखी एक जागतिक विक्रम तिने आधीच आपल्या नावे केला आहे. रोलर स्केटिंगसोबतच तिने आइस स्केटिंग, बॅंडी हॉकीमध्येही राष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडली आहे. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभाग घेत आजपर्यंत तिने १०० हून अधिक सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके पटकावली आहेत. नुकत्याच इंडोनेशियात झालेल्या स्पर्धेत तिने आणखी एक सुवर्णपदक जिंकत भारताचा तिरंगा उंचावला. तिच्या कर्तृत्वाची दखल भारत भूषण, हिंद रत्न, एशियन बुक ऑफ रेकॉर्ड, इंडो एशियन रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्ससह अनेक पुरस्कारांनी घेतली आहे.
.........................
प्रशिक्षक संतोषकुमार मिश्रा यांचे मार्गदर्शन
अन्विताच्या सातत्यपूर्ण प्रगतीमागे प्रशिक्षक संतोषकुमार मिश्रा यांचे काटेकोर प्रशिक्षण निर्णायक ठरले. रोज अनेक तास केले जाणारे फिटनेस व तांत्रिक प्रशिक्षण, शारीरिक लवचिकता, वेग नियंत्रण आणि मनाची एकाग्रता यामुळे तिने स्वतःला जागतिक दर्जाच्या खेळाडूपर्यंत पोहोचवले. अन्विताचे अंतिम ध्येय ऑलिंपिक सुवर्णपदक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

