तरघर रेल्वे स्थानकाच्या नावावरून वाद
तरघर रेल्वे स्थानकाच्या नावावरून वाद
मोहा कोळीवाडा व तरघर ग्रामस्थ आमनेसामने
सिडकोसमोर पुराव्यांचे सादरीकरण; निर्णयाची प्रतीक्षा
रसिका म्हात्रे ः सकाळ वृत्तसेवा
उलवे, ता. १० ः नेरूळ-उरण लोकल मार्गावरील नव्या तरघर रेल्वे स्थानकाच्या नावावरून वाद चिघळला आहे. स्थानक प्रत्यक्षात मोहा कोळीवाडा परिसरात असूनही सिडकोने त्यास ‘तरघर’ हे नाव देताच मोहा ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवत नाव बदलण्याची मागणी केली आहे; मात्र पुनर्वसित तरघर गावातील नागरिकांनी याला जोरदार विरोध दर्शवत स्थानकाचे नाव कायम ‘तरघर’ ठेवण्याचा आग्रह धरला आहे. दोन्ही गावांचे दावे ठाम असून नाव प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सिडकोसमोर पुरावे, दस्तऐवज आणि युक्तिवाद मांडले आहेत. त्यामुळे विषय भावनिक, ऐतिहासिक आणि भू-हद्दीच्या प्रश्नाशी जोडला गेल्याने दोन्ही बाजूंत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोहा कोळीवाडा ग्रामस्थांनी सिडकोकडे जमिनीची कागदपत्रे, ७/१२ उतारे, मालकी हक्क दाखले आणि हद्द नकाशे सादर केले आहेत. त्यांचा ठाम दावा आहे, की नवीन स्थानकाचा पूर्ण परिसर मोहा गावाच्या हद्दीत येतो. स्थानकाचे नाव ‘तरघर’ का ठेवावे, यामागे कोणताही भौगोलिक आधार नाही. हे आमच्या गावात आहे, जमीन आमची आहे, मग नावही ‘मोहा’च हवे, असे ग्रामस्थांनी बैठकीत सांगितले.
दुसरीकडे, विमानतळ प्रकल्पासाठी जमीन गेलेल्या तरघर गावातील नागरिकांचे म्हणणे आहे, की त्यांचे मूळ गाव नकाशात आजही तरघर या नावानेच नोंदलेले आहे. गावाचा इतिहास, धार्मिक स्थळे आणि भू-हद्दीच्या दृष्टीने स्थानकाला ‘तरघर’ हेच नाव योग्य आहे, असे ते म्हणतात. स्थानक ज्या जमिनीवर बांधले गेले आहे, ती जमीन कायदेशीररीत्या तरघर गावातून सिडकोकडे हस्तांतरित झाली आहे. सिडकोने ज्या परंपरेनुसार स्थानकांना त्यांच्या मूळ गावाच्या नावानुसार ओळख दिली जाते, ती परंपरा मोडता कामा नये, असा पुनर्वसित ग्रामस्थांचा ठाम आग्रह आहे.
दोन्ही गावांनी आपल्या बाजूने दस्तऐवज सिडकोकडे सादर केल्यानंतर सिडको प्रशासनावरही निर्णयाचा दबाव वाढला आहे. स्थानकाचे नाव बदलायचे की कायम ठेवायचे, याबाबत अद्याप कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत. वाद वाढू नये म्हणून लवकरच दोन्ही ग्रामस्थांसोबत संयुक्त बैठक घेऊन समितीमार्फत अंतिम निर्णय केला जाणार असल्याचे प्रशासनाचे संकेत आहेत.
कोट
पुनर्वसन म्हणजे गाव संपले असा अर्थ नाही. आमचा इतिहास, आमची परंपरा, नकाशे आणि हद्द - सर्व काही ‘तरघर’च्या नावानेच नोंदलेले आहे. त्यामुळे स्थानकाचे नाव बदलणे म्हणजे आमच्या अस्तित्वावर गदा आणण्यासारखे आहे.
- धीरज ओवळेकर, अध्यक्ष, तरघर पुनर्वसन समिती, पनवेल तालुका पश्चिम युवा मोर्चा भाजप
चौकट
भू-हद्दीचा गुंता
गावाच्या नावाचा प्रश्न हा स्थानिकांच्या इतिहासाशी, भावनिक ओळखीसह सामाजिक अस्तित्वाशी थेट जोडलेला असल्याने हा वाद केवळ ‘नावाचा’ न राहता प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. दोन्ही गावांचे नागरिक आपल्या बाजूने ठोस पुरावे मांडत असल्याने सिडकोचा निर्णय कोणत्या बाजूला झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वादाचा निवाडा होईपर्यंत स्थानकाचे बोर्ड तसेच अधिकृत नोंद ‘तरघर’ या नावानेच कायम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

