हल्ला करून फरार होणारे आरोपी

हल्ला करून फरार होणारे आरोपी

Published on

व्यावसायिकावरील हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक
कर्ज फेडण्यासाठी दाम्पत्याने रचला कट; १२ तासांत जेरबंद
नालासोपारा, ता. १० (बातमीदार) ः वसईच्या वालीव परिसरातील अंबिका ज्वेलर्स मालकावर पत्नीच्या मदतीने धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या पती-पत्नीला १२ तासांच्या आत अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष चारच्या पथकाला यश आले आहे. कर्जबाजारातून झटपट मुक्त होण्यासाठी पत्नीच्या मदतीने ज्वेलर्स लुटण्यासाठी गेले असता, ज्वेलर्स मालकाने विरोध केल्याने प्राणघातक हल्ला केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

सोहेल शराफत खान (वय २३) आणि फिरदोस बानो सोहेल खान असे अटक करण्यात आलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. त्यांच्यासोबत दीड वर्षांची मुलगीही आहे. हे दाम्पत्य उत्तर प्रदेशातील झांशी जिल्ह्यातील टेहरोली तालुक्यात राहणारे आहे. मंगळवारी (ता. ९) हे दीड वर्षांच्या मुलीसह अंबिका ज्वेलर्समध्ये आले होते. प्रथम त्यांनी सोने घेण्याचा बहाणा केला. नंतर त्यांनी पाणी मागितले. पाणी देण्यासाठी ज्वेलर्स मालक आतील रूममध्ये गेला असता, त्याला रूममध्ये बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात आरोपी आणि ज्वेलर्स मालक यांच्यात झटापट झाली. त्याच वेळी आरोपीने धारदार चाकूने वार केले. रक्तबंबाळ झालेल्या दुकान मालकाला पाहून हे दाम्पत्य कारमधून फरार झाले होते. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी सुरू केली होती. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही आधारे कारच्या नंबरवरून मालकाचा शोध घेऊन, आरोपीचा शोध सुरू होता.
गुन्हे शाखा कक्ष चारचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने नाशिक रेल्वे स्थानकातून आरोपी दाम्पत्याला अटक केली.
------
गुन्हा का केला?
सोहेल हा २०१५ ते २०२० दरम्यान नायगाव परिसरात एका बल्बच्या कंपनीत कामाला होता. त्या वेळी तो आपल्या पाच बहिणी आणि आई- वडिलांसह नायगावमध्ये राहत होता. कोरोनानंतर तो उत्तर प्रदेशला गेला. त्याठिकाणी त्याने किराणा मालाचे दुकान सुरू केले होते. २०२२ मध्ये सोहेल याचे लग्न झाले. त्याला दीड वर्षांची मुलगी आहे. सोहेल हा चारचाकी गाड्यांचा शौकीन होता. त्यामुळे त्याने कर्ज काढून दोन गाड्या घेतल्या होत्या. दोन्ही गाड्या स्वतःच वापरत होता. शेवटी एका किराणा दुकानावर गाड्यांचे कर्ज फेडणे शक्य झाले नाही. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने ज्वेलर्सला लुटण्याची शक्कल लढवली होती.

कट कसा रचला?
--------------------------------
कर्ज फेडण्यासाठी आपल्या पत्नीला विश्वासात घेऊन ज्वेलर्सला लुटण्याचा कट त्याने रचला होता. एक महिन्यापूर्वी सोहेल हा मुंबईत आला. तेव्हा त्याने एका चारचाकी एजन्सीला आपली कागदपत्रे देऊन एक गाडी भाड्याने घेऊन विश्वास संपादन केला होता. शनिवारी (ता. ६) तो पुन्हा वसई परिसरात आपली पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलीला घेऊन आला. त्याने दोन दिवस रेकी केली. त्यानंतर अंबिका ज्वेलर्समधील सडपातळ व्यक्ती आहे. त्याला आपण सांभाळू शकतो, काही झाले तर माझ्या पत्नीला त्याने छेडले म्हणून वार केले, असा बहाणा करू शकतो आणि लहान मूल असल्याने आपल्यावर कोणी संशय घेणार नाही, असा डाव दोघांनी रचला होता. त्याप्रमाणे अंबिका ज्वेलर्समध्ये जाऊन लुटण्याचा प्रयत्न केला; पण मालकाने विरोध केल्याने त्याच्यावर वार करून हे फरार झाले होते. पोलिसांनी १२ तासांत त्यांना बेड्या ठोकल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com