गेटवे ऑफ इंडिया राष्ट्रभक्तीने उजळला
गेटवे ऑफ इंडिया राष्ट्रभक्तीने उजळला
नौदलाचा बीटिंग रिट्रीट आणि टॅटू समारंभ दिमाखात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः मुंबईचे वैभव असलेले गेटवे ऑफ इंडिया परिसर भारतीय नौदलाच्या ‘बीटिंग रिट्रीट अँड टॅटू सेरेमनी २०२५’मुळे राष्ट्रभक्तीच्या उत्साहात न्हाऊन निघाले. पश्चिम नौदल कमांडतर्फे सोमवार (ता. ८) ते बुधवार (ता. १०) आयोजित या सोहळ्याने मुंबई किनारपट्टीवर नौदलाच्या परंपरा, शिस्त आणि सामर्थ्याचे भव्य दर्शन मुंबईकरांना पाहायला मिळाले.
बुधवारी झालेल्या मुख्य कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पश्चिम नौदल कमांडचे कमांडर-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल कृष्णा स्वामिनाथन (एव्हीएसएम, व्हीएसएम) यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. भारतीय नौदल दरवर्षी ४ डिसेंबरला नौदल दिन साजरा करते. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारतीय नौदलाने कराची बंदरावर केलेल्या निर्णायक हल्ल्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. या कारवाईत पाकिस्तान नौदलाच्या अनेक युद्धनौका उद्ध्वस्त झाल्या होत्या आणि कराची बंदर पेटून उठले होते. या गौरवशाली इतिहासाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडियावर साकारलेला हा समारंभ प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला. ‘सी कॅडेट कॉर्प्स’च्या कॅडेट्सनी सादर केलेल्या पारंपरिक ‘सेलर्स हॉर्नपाईप डान्स’ने उपस्थितांची मने जिंकली. युवकांच्या उत्साहातून नौदलाची सागरी परंपरा जिवंतपणे अनुभवता आली.
शिस्त आणि सामर्थ्याचे दर्शन
भारतीय नौदलाच्या सेंट्रल बँडने सादर केलेल्या देशभक्तीपर धुनी आणि अचूक, लयबद्ध कंटिन्युईटी ड्रिलमधून नौदलाची शिस्त, अचूकता आणि व्यावसायिकता अधोरेखित झाली. नौदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे सादर करण्यात आलेल्या हवाई प्रात्यक्षिकांनी आकाशात थरार निर्माण केला.
रोषणाईत न्हालेल्या युद्धनौका
कार्यक्रमादरम्यान मुंबई बंदरात अँकरजवर उभ्या असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकांची एकाच वेळी रोषणाई करण्यात आली. गेटवे ऑफ इंडियाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशझोतात न्हालेल्या या युद्धनौका पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्याला नौदलाचे अधिकारी, जवान व त्यांचे कुटुंबीय, शासकीय अधिकारी, माजी सैनिक, समाजातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने मुंबईकर उपस्थित होते. भारतीय नौदलाच्या अदम्य शौर्याचा, निष्ठेचा आणि देशाच्या सागरी सीमांच्या संरक्षणासाठी असलेल्या कटिबद्धतेचा या वेळी सामूहिक गौरव करण्यात आला.

