अशेरीगडावर सहावी तोफ सापडली
अशेरीगडावर सहावी तोफ सापडली
शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानला गडरक्षकांना यश
कासा, ता. ११ (बातमीदार)ः शिलाहारकालीन अशेरीगडावर पाच-सहा वर्षांपासून संवर्धन मोहिमेला रविवारी मोठे यश मिळाले. घनदाट जंगल, वन्यप्राण्यांचा वावर आणि कठीण भूभागाचा सामना करत जवळपास चार तासांच्या प्रदक्षिणेनंतर किल्ल्यावरची सहावी तोफ शोधण्यात यश आले.
अशेरीगडावर आतापर्यंत पाच तोफा सापडल्या होत्या. यातील दोन तोफा २३ फेब्रुवारी, २ मार्च रोजी झालेल्या शोधमोहिमेदरम्यान सापडल्या होत्या. रविवारी पार पडलेल्या मोहिमेत गडरक्षक अनिकेत कुडतरकर, मनोज मोरे, रवींद्र गुरव, प्रतिक जुवले उपस्थित होते. किल्ल्यावरील खडतर परिसरात सातत्याने शोधकार्य करून अखेर सहावी तोफ हाती लागल्याने ऐतिहासिक संदर्भांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जाते.
--------------------------------
गडसंवर्धनाला यश
अशेरीगड किल्ला पोर्तुगीज, मराठ्यांमधील लढाईचा साक्षीदार आहे. संभाजीराजांनी स्पर्श केलेली दुर्गभूमी शौर्य आणि इतिहासाचा साक्षीदार आहे. नवीन तोफ लवकरच गडावर प्रतिष्ठापित केली जाणार असून, या यशामुळे गडसंवर्धनाच्या मोहिमेला नवे बळ मिळाले आहे.

