सरकारी नोकरीचे आमिष दाखवून महिलेची लाखोंची फसवणूक
सरकारी नोकरीचे प्रलोभन दाखवून महिलेची लाखोंची फसवणूक
पनवेला, ता. ११ (वार्ताहर) : स्टाफ नर्स म्हणून खात्रीशीर सरकारी नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून एका भामट्याने खांदा कॉलनीत राहणाऱ्या महिलेकडून चार लाख ५० हजारांची रक्कम उकळून तिला बनावट जॉइनिंग लेटर पाठवून तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनिकेत धनंजय पाठक, असे या भामट्याचे नाव असून, खांदेश्वर पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या भामट्याने अशाच पद्धतीने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणातील तक्रारदार माया गायकवाड (वय ३५) ही खांदा कॉलनीत कुटुंबासह राहण्यास आहे, तर आरोपी अनिकेत पाठक हा दौंड भागात राहण्यास असून, तो सध्या येरवडा येथील मनोरुग्णालयात कार्यरत आहे. २०१३ रोजी माया गायकवाड नाशिक येथे नर्सिंगचा कोर्स करत असताना, तिची आरोपी अनिकेत पाठक याच्याशी ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा उचलत पाठक याने मे २०२४ मध्ये मायाला संपर्क साधला होता. तसेच तिने डी.एमई.आर ही स्टाफ नर्सची २०२३ ची परिक्षा दिली असल्यास तिला सरकारी नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवले होते. तसेच त्याने काही मुलांना नोकरीला लावल्याचे सांगून तिला खात्रीशीर सरकारी नोकरीला लावण्याचे आश्वासन दिले होते. पाठकच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मायाने पाठक याच्या खात्यावर चार लाख ५० हजार रुपये ऑनलाइन पाठवले. त्यानंतर पाठक याने डिसेंबर २०२४ मध्ये बनावट ई-मेलवरून तिला संभाजीनगर येथील सरळ सेवा अधिपरिचारिका (गट-क) या पदाचे बनावट जॉइनिंग लेटर पाठवून देत तिचा विश्वास संपादन केला. त्यात ३० दिवसांच्या आत नोकरीच्या ठिकाणी हजर होण्याबाबत मजकूर असताना, पाठक याने तिला नोकरीच्या ठिकाणी जाऊ दिले नाही. त्यानंतर गत एप्रिल महिन्यात पाठक याने खांदेश्वर रेल्वेस्थानकजवळ भेट घेऊन तिला दुसरी बनावट जॉइनिंग ऑर्डर दिली, मात्र त्या ठिकाणी हजर न होण्यास व तो सांगेल, तेव्हा हजर होण्यास सांगितले.

