घोडबंदरसाठी ‘समन्वयाचा पूल’

घोडबंदरसाठी ‘समन्वयाचा पूल’

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : घोडबंदर, गायमुख रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणासाठी वन विभागाचा अडथळा दूर करण्यासाठी ठाणे आणि मिरा-भाईंदर महापालिकेने स्वतंत्र प्रस्ताव पाठवल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रस्तावांमध्येही अनेक त्रुटी आढळल्याचे कारण दाखवून वन विभागाची अडवणूक सुरू आहे. याची गंभीर दखल घेत आता ठाणे आणि मिरा-भाईंदर महापालिकांनी समन्वय साधून यापुढे घोडबंदरचा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यासाठी समन्वय अधिकारी नेमण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

कोंडीमुळे वादात सापडलेल्या घोडबंदर मार्गावरील गायमुख रस्त्याची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. वारंवार दुरुस्त करूनही हा मार्ग अधिक धोकादायक ठरत आहे. डिसेंबरमध्ये या रस्त्यासाठी दोनवेळा काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या आठड्यात दोन दिवस हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. आता १२ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून पुढील दोन दिवस दुरुस्तीसाठी पुन्हा घोडबंदर मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे, मात्र या दुरुस्त्या तात्पुरती मलमपट्टी ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. डांबरीकरण टिकत नाही, मास्टिकही फोल ठरले आहे. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण, तसेच काँक्रीटीकरण करणे अत्यावश्यक ठरले आहे.

गायमुख मार्ग हा वन विभागाच्या अखत्यारीत असून, पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येते. त्यामुळे गायमुख रुंदीकरणाचे ‘घोडे’ अडले आहे. ठाणे आणि मिरा-भाईंदर या दोन्ही पालिकांच्या हद्दीतून गायमुख मार्ग जात असल्याने वन विभागाचा हा अडथळा दूर करण्यासाठी दोन्ही महापालिकांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या, मात्र या दोन्ही महापालिकांनी स्वतंत्र प्रस्ताव तयार करून ते वन विभागाला सादर केले आहेत. या प्रस्तावांमध्येही अनेक त्रुटींवर विभागाने बोट ठेवले असल्याचे समजते.

ना हरकत प्रमाणपत्रासाठी प्रयत्न
वन विभागाने सुचविलेल्या त्रुटी तातडीने दूर करण्यासाठी दोन्ही महापालिकांनी एक समन्वय अधिकारी नियुक्त करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ही जबाबदारी बहुतेक ठाणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर सोपवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा अधिकारी या दोन्ही महापालिकांमध्ये समन्वय साधून वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समजते.

नागपूरमध्ये उच्चस्तरीय बैठक
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घोडबंदर मार्गावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मिरा-भाईंदर आणि ठाणेकरांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या घोडबंदर ते फाउंटन हॉटेल आणि फाउंटन हॉटेल ते गायमुख या दोन्ही टप्प्यांवरील रस्ता रुंदीकरण व विकासकामांना गती देण्यासाठी वन विभागाचा ना हरकत दाखला अत्यंत महत्त्वाचा आहे.

तातडीने निर्णय घेण्यासाठी मदत
दोन्ही महापालिकांनी आपले प्रस्ताव वन विभागाकडे सादर केले असले, तरी त्यात त्रुटी आढळल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ही समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या प्रलंबित प्रस्तावांची स्थिती, अडचणी आणि पुढील कार्यवाहीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, तसेच सर्व अडथळे दूर करून कामाला गती देण्याचे स्पष्ट आणि कठोर निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.


- दोन दिवस मार्ग वाहतुकीसाठी बंद.
- वन विभागाचा अडथळा दूर करणार.
- कामाला गती मिळण्यासाठी प्रयत्न.
- पालिकांच्या प्रस्तावांमध्ये अनेक त्रुटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com