पनवेलमध्ये रूम विक्रीच्या बहाण्याने उकळले १३ लाख
पनवेलमध्ये रूमविक्रीच्या बहाण्याने उकळले १३ लाख
बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
पनवेल, ता. ११ (वार्ताहर) : स्वस्तात रूम मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून पनवेलमधील एका बांधकाम व्यावसायिकाने पाच रूम विक्रीचे आश्वासन देत तीन जणांकडून तब्बल १३ लाख रुपये घेतले, मात्र त्याने रूम दिली नाही आणि पैसेही परत केले नाहीत. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितांनी पनवेल शहर पोलिसांकडे धाव घेतली असून, आरोपी बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंत पांडुरंग चव्हाण (४३) असे या बिल्डरचे नाव असून, पोलिस तपास सुरू आहे.
गणेश डोईफोडे (घाटकोपर, मुंबई) यांना सप्टेंबर २०२३ मध्ये गुंतवणुकीसाठी घर घेण्याची इच्छा होती. एका मित्रामार्फत त्यांची आरोपी हनुमंत चव्हाण याच्याशी ओळख झाली. साईराज कन्स्ट्रक्शन बिल्डर अँड डेव्हलपर्सचा संचालक असल्याचे सांगत चव्हाणने पनवेलमधील मौजे कोळखे गावातील ओम साई होम या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील रूम विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले.
डोईफोडे यांनी ३०१ व ३०२ क्रमांकाच्या दोन रूमचे बुकिंग करत पाच लाख ५० हजार रुपये चव्हाणच्या खात्यावर पाठवले. उर्वरित रक्कम रजिस्ट्रेशनवेळी देण्याचे ठरले. पुढे डोईफोडे यांनी ही माहिती आपल्या मित्रांना, डॉ. सिताराम म्हस्के आणि प्रकाश भोसले दिल्यानंतर त्यांनीही ३०३, ४०२ आणि ४०३ क्रमांकाच्या रूमसाठी सात लाख ५० हजार रुपये चव्हाणला दिले. याप्रकारे तिघांकडून एकूण १३ लाख रुपये घेतले गेले.
परंतु त्यानंतर चव्हाणने रजिस्ट्रेशनसाठी टाळाटाळ सुरू केली. याबाबत कोळखे ग्रामपंचायतीत चौकशी केली असता ओम साई होम या इमारतीला फक्त दोन मजल्यापर्यंतच परवानगी असल्याचे समोर आले. चव्हाणने विक्रीस काढलेल्या रूम या दुसऱ्या मजल्यापेक्षा वरच्या असल्याने त्या अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले.
फसवणूक उघडकीस आल्यानंतर तिघांनी ९ डिसेंबर रोजी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हनुमंत चव्हाणविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

