महायुतीतच वर्चस्वाची लढाई

महायुतीतच वर्चस्वाची लढाई

Published on

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीची तारीख २० डिसेंबरला ढकलताच शहरातील राजकीय पट पुन्हा एकदा हलला आहे. प्रचारासाठी आधीच कोट्यवधींची उधळण केलेल्या उमेदवारांचे संपूर्ण गणित बिघडले असून, आता नव्याने रणनीती आखण्याची धडपड सुरू झाली आहे. महायुतीचे सूर राज्यात जुळत असले तरी अंबरनाथमध्ये भाजपविरुद्ध शिवसेना असा महायुतीतील थेट दोन गटांमध्ये थेट लढत आकाराला येत आहे. नगराध्यक्षपदासाठी शिंदे गटाच्या मनीषा अरविंद वाळेकर आणि भाजपच्या तेजश्री करंजुले यांच्यातील संघर्षही या निवडणुकीची मध्यवर्ती लढत मानली जात आहे.

राज्यात महायुतीचा गजर सुरू असला तरी अंबरनाथमध्ये समीकरण पूर्णपणे वेगळे आहे. येथे थेट भाजपविरुद्ध शिवसेना (शिंदे गट) अशी टक्कर उभी राहिली आहे. नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत शिंदे गटाच्या मनीषा वाळेकर आणि भाजपच्या तेजश्री करंजुले यांच्या प्रचार कार्यालयात दिवसरात्र रणनीतीसाठी बैठका सुरू असून ‘कोणाचा किल्ला भक्कम’ हे पाहण्यासाठी पक्षनेतेही या भागात नियमित फेऱ्या मारताना दिसत आहेत. अंबरनाथमधील ही निवडणूक महायुतीतील अंतर्गत समीकरणे किती स्थिर आहेत, याचीही मोठी परीक्षा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

समाजमाध्यम रणांगण बनले
निवडणूक पुढे ढकलल्याने प्रत्यक्ष घराघरांतील प्रचारात अचानक खंड पडला. या पोकळीचा परिणाम टाळण्यासाठी आता दोन्ही गटांचे लक्ष समाजमाध्यमांकडे वळले आहे. बूथवार लक्ष्यपत्रके, व्हिडिओ, आक्रमक व्हॉट्सॲप मोहीम, स्थानिक इन्फ्लुएन्सर्सचा वापर अशा मार्गांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याची चढाओढ जोरात सुरू आहे.

भाजपची ‘गुप्त राजकीय चाल’?
निवडणूक पुढे ढकलल्यानंतर निर्माण झालेल्या रिकाम्या काळात भाजपने ‘गुप्त राजकीय चाल’ खेळल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटातील उमेदवारांना भेटून ‘तुमचा प्रचार तुम्ही करा; पण मतदारांना एक नंबरचे बटण दाबायला सांगा’ असा विनंतीसारखा संदेश देण्यात आल्याच्या कुजबुजीमुळे अंबरनाथचे राजकारण अधिकच तापले आहे. काही उमेदवारांना यासाठी लाखोंची आर्थिक ‘मदत’ दिल्याची गोपनीय चर्चादेखील वातावरणाला गती देत आहे. अंबरनाथमध्ये भाजपचे किती नगरसेवक येतात, यापेक्षा नगराध्यक्षपदावर फोकस करा, असा संदेश भाजप कार्यकर्त्यांना वरिष्ठाच्या गोटातून आल्याचे बोलले जाते आहे. या चर्चांमुळे निवडणुकीचा रंग अधिक गडद झाला आहे.

बदलापूरप्रमाणे ‘पैशांचा पाऊस’?
बदलापूरच्या निवडणुकीत मतदारांकडे खुलेपणाने पैशांची उधळण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्येही हा ‘ट्रेंड’ दिसणार का, यावर सर्वांचे लक्ष आहे. निवडणूक पुढे ढकलल्याने प्रचारासाठी आणखी निधी ओतावा लागणार असल्याने उमेदवारांवरील आर्थिक दबाव वाढला आहे.

निवडणूक जवळ येताच वातावरण तापले
शहरातील वातावरण दिवसेंदिवस तंग होत असून प्रचाराची भाषा, आरोप-प्रत्यारोप, सोशल मीडिया युद्ध सगळेच अधिक आक्रमक होत आहेत. २० डिसेंबरची तारीख जसजशी जवळ येते, तसतशी ही लढत प्रतिष्ठेची नव्हे, तर राजकीय अस्तित्वाची बनत चालली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com