मुरूडमध्ये सिकलसेल सप्ताहाची उत्साहपूर्ण सुरुवात
मुरूडमध्ये सिकलसेल सप्ताहाची उत्साहपूर्ण सुरुवात
प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली-मांडला येथे तपासणी व उपचार मार्गदर्शन
मुरूड, ता. ११ (बातमीदार) : मुरूड तालुक्यात सिकलसेल जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या सिकलसेल सप्ताहाला (११ ते १७ डिसेंबर) प्राथमिक आरोग्य केंद्र, बोर्ली-मांडला येथून औपचारिक सुरुवात झाली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अक्षयकुमार सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश सिकलसेल आजाराबाबत ग्रामीण भागात जागरूकता वाढवणे, तपासणी सुविधा उपलब्ध करणे आणि रुग्णांना मार्गदर्शन करणे आदी आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका सिकलसेल सहाय्यक शालीकराव पावरा यांनी केले.
या वेळी सिकलसेल आजाराबाबत माहिती देताना शालीकराव पावरा म्हणाले की, सामान्य व्यक्तीच्या रक्तामध्ये लाल रक्तपेशी गोल आणि लवचिक असतात व त्यांचे आयुष्य १२० दिवस असते, मात्र सिकलसेल आजारात ऑक्सिजनची कमतरता भासल्यास पेशी विळ्यासारख्या आकाराच्या होतात आणि त्यांचे आयुष्य केवळ २० ते ३० दिवस असते. यामुळे रुग्णांना रक्तक्षय, अशक्तपणा, हातापायांची सूज, तीव्र सांधेदुखी, कावीळ, जखमा न बऱ्या होणे, पित्ताशय व मूत्रपिंडाचे आजार, डोळ्यांवर परिणाम, जंतुसंसर्ग अशा गंभीर तक्रारी उद्भवतात. सिकलसेल तपासणीसाठी सोल्युबिलिटी टेस्ट ही चाचणी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि जिल्हा रुग्णालयातून मोफत केली जाते. रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोळंके यांनी सांगितले की, पुढील काही दिवसांत मुरूड ग्रामीण रुग्णालय तसेच बोर्ली-मांडला, आगरदांडा आणि तालुक्यातील सर्व उपकेंद्रामध्ये जनजागृती कार्यक्रम आणि तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. उद्घाटन सत्रात अनेक रुग्णांची सिकलसेल सोल्युबिलिटी तपासणीही करण्यात आली. या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ घरडे, डॉ. प्रसाद उपाध्ये, जिल्हा व्यवस्थापक संतोष पाटील, तालुका लेखापाल नंदकुमार घाडगे, रोग्य सेविका कविता मासाळ तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते.
............
पालेभाज्यांसह कडधान्ये गरजेची
अँटिबायोटिक्स, हायड्रॉक्सीयुरिया, फॉलिक ॲसिड गोळ्या नियमित घेणे, अति परिश्रम टाळणे तसेच आहारामध्ये पालक, बीट, गूळ, शेंगदाणे, डाळिंब, शेवगा, खजूर, मासे, अंडी, संत्री, पालेभाज्या आणि मोड आलेले कडधान्य यांचा समावेश करणे आवश्यक असल्याचे या वेळी शालीकराव पावरा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

