पर्यटन हंगामात बिबट्याचा गोंधळ
पर्यटन हंगामात बिबट्याचा गोंधळ
अलिबाग-मुरूडमध्ये ८० टक्के बुकिंग धोक्यात; पर्यटन व्यवसाय अडचणीत
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ११ : अलिबाग-मुरूड परिसर हा अथांग समुद्र, रुपेरी वाळू, स्वच्छ किनारे आणि आंबा, नारळाच्या हिरव्या बागांनी सजलेला पर्यटनपट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबई आणि पुण्याच्या जवळ असल्याने वर्षाअखेरीस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक या परिसराची निवड करतात. यंदाही नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी अलिबाग, मुरूड परिसरातील रिसॉर्ट्स, होमस्टे, फार्महाउस यांची सुमारे ८० टक्के बुकिंग आधीच पूर्ण झाली होती. वर्षातील शेवटचे क्षण शांततेत आणि आनंदात घालविण्याचा पर्यटकांचा बेत पक्का केलेला असताना बिबट्याने गोंधळ घातला. या बिबट्याला वन विभागाने अद्याप जेरबंद केलेले नसल्याने त्याच्या भीतीने झालेली बुकिंग रद्द होऊ लागली आहे.
पर्यटकांची सर्वाधिक रहदारी असलेल्या नागाव परिसरात अचानक प्रकट झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यांनी संपूर्ण वातावरणच ढवळून निघाले. मंगळवार (ता. ९) पासून सलग दोन दिवस या बिबट्याने गोंधळ घातला. त्याचा वारंवार दिसणारा वावर आणि हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या काळात बिबट्याने सहा जणांना जखमी केले, ज्यामुळे परिस्थिती गंभीर बनली. त्यानंतर तो अचानक गायब झाला आणि तो कुठे लपून बसला आहे, याचा कोणताही ठावठिकाणा अद्याप वन विभागाकडे नाही, ही परिस्थिती अधिक भयावह मानली जात आहे. नागावसह आसपासच्या भागात बिबट्याची दहशत एवढी पसरली की येथील शाळा, दुकाने, कॉटेजेस, होम-स्टे आणि पर्यटन व्यवसाय दोन दिवस पूर्णपणे ठप्प राहिले. नागाव किनाऱ्यावर आलेले अनेक पर्यटक भीतीने परत फिरले. काहींनी आधी केलेल्या बुकिंग्स रद्द करून सुरक्षेचा मार्ग निवडला. याचा प्रत्यक्ष परिणाम संपूर्ण पर्यटन हंगामावर होत असून, नाताळ आणि नववर्षाच्या आरक्षणांचे रद्द होणे सुरू झाले आहे. आंबा, नारळ बागांमध्ये काम करणारे मजूरदेखील बिबट्याच्या भीतीने काम करायला धजावत आहेत. त्यामुळे शेतीकामासह दैनंदिन जीवनही विस्कळित झाले आहे. नागाव आणि आसपासच्या गावांतील होम-स्टे मालक, हॉटेल व्यावसायिक, रिक्षाचालक, स्थानिक दुकानदार यांचे उत्पन्न प्रामुख्याने पर्यटकांवर अवलंबून असल्याने, अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
----
अलिबाग, मुरूड परिसरात वर्षअखेरीचा हंगाम हा सर्वात मोठा महसूल देणारा काळ असतो, मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे हा हंगामच धोक्यात आला आहे. परिस्थिती अशीच राहिली, तर पर्यटन महसुलात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पर्यटन व्यावसायिकही या संकटामुळे चिंताग्रस्त आहेत आणि वन विभागाकडून तातडीने उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
- सचिन राऊळ, पर्यटन व्यावसायिक नागाव
----
नागरिकांच्या गोंधळामुळे तो अधिकच घाबरून गेला होता. या गोंधळामुळे तो बिबट्या पुन्हा जंगलात निघून गेलेला असावा. बुधवारपासून त्याचा वावर या परिसरात नव्हता. येथील नागरिकांना सावधानतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
- राहुल पाटील, उपवन संरक्षक, अलिबाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

