अनेक भागात तीव्र पाणी टंचाई
अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई
वितरण व्यवस्थेत दोष; विधिमंडळात पडसाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः मुंबईच्या सात धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतके पाणी आहे; मात्र उपनगरातील अनेक भागांत तीव्र पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पुरेशा दाबाने आणि नियोजित वेळेत पाणी मिळावे, यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयांशी पत्रव्यवहार करूनही पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी कमी होत आहेत. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटू लागले आहेत.
यंदाचा पावसाळा खूप लांबला. सर्व तलावांमध्ये मुबलक पाणी आहे; मात्र पाण्याच्या वितरण व्यवस्थेच्या शेवटच्या टोकाच्या वसाहतींमध्ये सध्या तुटवडा जाणवू लागला आहे. डोंगर भागातील झोपडपट्ट्यांमध्येही पाण्याची समस्या गंभीर आहे. पुरेसा जलसाठा असूनही पाण्यासाठी नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या विभाग कार्यालयांकडे नागरिक पुरेशा पाणीपुरवठ्यासाठी पाठपुरावा करीत आहेत; मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडला.
प्रशासनाचे म्हणणे काय?
पाण्याच्या वितरण व्यवस्थेत दोष आहे. त्यात जलवाहिन्यांची कामेही सुरू आहेत. पाण्याची गळती यामुळे मुंबईत काही ठिकाणी पाण्याची समस्या असल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागाने म्हटले आहे.
पाणीटंचाई असलेले विभाग
सध्या कांदिवली, चारकोप, दहिसर, मालाड, मालवणी, वांद्रे पश्चिम, अंधेरी, वरळी, घाटकोपर, मुलुंड, चेंबूर, कुर्ला, ट्राम्बे, गोवंडी, वडाळा या भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्याची कपात असो वा नसो, या भागातील समस्या अधिक तीव्रतेने भेडसावत आहे.
काही भागांत दूषित पाणी
झोपडपट्ट्यांना होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असला तरी सुरुवातीला होणारा पाणीपुरवठा गढूळ आणि दूषित असतो, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचे स्थानिकांच्या तक्रारी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

